एका भारतीय नायकाची शौर्यगाथा लवकरच प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे. अभियंता जसवंत सिंग गिल यांची जीवन कहाणी चित्रपटरूपात रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. जसवंत सिंग गिल यांनी १९८९ मध्ये कोळश्याच्या खाणीत अडकलेल्या कामगारांना अत्यंत कठीण परिस्थितीत वाचवले होते. ही भूमिका बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) साकारणार आहे.
केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री - भारत सरकार प्रल्हाद जोशी यांनी ट्विटरवर स्वर्गीय गिल यांचे स्मरण केले आहे. पडद्यावर अशी भूमिका साकारण्याची संधी मिळाल्यामुळे भारावून गेलेल्या अक्षय कुमारने ट्विटरवर आपला आनंद व्यक्त केला आहे. अक्षय म्हणाला की, या कथेसारखी दुसरी कथा नाही! या घोषणेबद्दल त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करत वाशू भगनानी यांनी रिट्विट केले.
विशेष म्हणजे, या चित्रपटाचे दिग्दर्शन टिन्नू सुरेश देसाई करणार आहेत, ज्यांनी यापूर्वी अक्षय कुमारसोबत राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट रुस्तममध्ये काम केले होते. अक्षय कुमार स्टारर पूजा एंटरटेनमेंटचा अनटाइटल्ड रिअल लाइफ रेस्क्यू ड्रामा २०२३ मध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट आधी 'कॅप्सूल गिल' नावाने रिलीज होणार होता. मात्र, अद्याप नावावर शिक्कामोर्तब होऊ शकलेले नाही.