बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याचा ‘हाऊसफुल 4’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. ‘हाऊसफुल’ फ्रेन्चाइजीच्या या चौथ्या चित्रपटात कॉमेडी आणि पीरियड ड्रामा याचे भन्नाट मिश्रण पाहायला मिळणार आहे. तूर्तास अक्षयचा हा सिनेमा वादात सापडला आहे. होय, या चित्रपटावर संगीत चोरल्याचा आरोप होत आहे. डेक्कन क्रोनिकलने दिलेल्या वृत्तानुसार, ‘हाऊसफुल 4’चा ट्रेलर रिलीज झाला होता, त्याच दिवशी अनेकांनी याच्या पार्श्वसंगीतावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या चित्रपटाचे पार्श्वसंगँत चिरंजीवी स्टारर ‘कैदी नंबर 150’मधून घेतल्याचा आरोप होत आहे.
विशेष म्हणजे ‘हाऊसफुल 4’च्या मेकर्सनी ‘कैदी नंबर 150’च्या म्युझिक डायरेक्टरला कुठलेही क्रेडिट दिलेले नाही. अर्थात मेकर्सनी हे पार्श्वसंगीत केवळ ‘हाऊसफुल 4’च्या ट्रेलरसाठी वापरले की अख्ख्या चित्रपटात कॉपी केलेय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मेकर्सनी अद्याप यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
‘हाऊसफुल 4’या चित्रपटात अक्षय कुमार, क्रीती सॅनन, बॉबी देओल, पूजा हेगडे, क्रीती खरबंदा आणि रितेश देशमुख यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला होता. यात 1419 आणि 2019 असे दोन काळ आपल्याला पाहायला मिळत आहे. ट्रेलरची सुरुवात 1419 काळातील व्यक्तिरेखांपासून होते. आपल्याला अक्षय, रितेश, बॉबी सगळेच एखाद्या राजा-महाराजांच्या वेशात पाहायला मिळतात. त्यानंतर आधुनिक काळ पाहायला मिळतो. यात रितेश आणि अक्षय लंडनमध्ये दिसतात. चित्रपटाचा सेट अतिशय भव्य असून अक्षयचा एक वेगळाच अंदाज या ट्रेलरमध्ये दिसतो.