अली फजलने थ्री इडियट या चित्रपटातील एका छोट्याशा भूमिकेद्वारे त्याच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्याने फुकरे, बॉबी जासूस, हॅपी भाग जाएगी यांसारख्या चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या. आता तो प्रस्थानम या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. या चित्रपटातील अलीच्या भूमिकेबाबत त्याच्याशी मारलेल्या गप्पा...
प्रस्थानम या चित्रपटात प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार आहे?प्रस्थानम हा चित्रपट एका दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक असला तरी हा चित्रपट एका वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आला आहे. प्रस्थानम हा दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित होऊन आता 10 वर्षांहून अधिक कालावधी झाला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या कथेत काळानुसार काही बदल करण्यात आले आहेत. तसेच हा चित्रपट खूप वेगळ्या पद्धतीने चित्रीत करण्यात आला आहे. या चित्रपटात उत्तरेकडील राजकारण प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून या चित्रपटाची भाषा देखील खूपच वेगळी आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा रिमेक नसून एक वेगळा चित्रपट असणार आहे.
प्रस्थानम या चित्रपटात अनेक सिनिअर कलाकार आहेत, त्यांच्यासोबत काम करण्याचा तुझा अनुभव कसा होता?मी हा चित्रपट प्रदर्शित व्हायची आतुरतेने वाट पाहात आहे. या चित्रपटात मनीषा कोईराला, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, सत्यजीत दुबे, अमायरा दस्तुर यांसारखे अनेक कलाकार आहेत. यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता. या चित्रपटाचे चित्रीकरण करताना मला खूप मजा आली. इतक्या चांगल्या आणि ज्येष्ठ कलाकारांसोबत काम करताना तुम्हाला देखील अनेक गोष्टी शिकायला मिळतात. ज्या कलाकारांना मोठ्या पडद्यावर पाहून मी लहानाचा मोठा झालो, त्यांच्यासोबत या चित्रपटाच्या निमित्ताने मला काम करायला मिळाले हे मी माझे भाग्य समजतो.
संजय दत्त यांचा तू फॅन आहेस, हे खरे आहे का?संजय दत्त यांचा मी खूप मोठा फॅन आहे. एवढेच नव्हे तर मी त्यांचा शेजारी देखील आहे. पण या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्याआधी त्यांना कधी भेटण्याची मला संधी मिळाली नव्हती. प्रस्थानम या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांना भेटल्यानंतर मी प्रचंड खूश झालो होतो. मी सगळ्यात पहिल्यांदा त्यांना भेटल्यावर एखाद्या फॅनप्रमाणे त्यांच्यासोबत फोटो काढला. माझ्यासाठी हा अनुभव खूपच छान होता.
या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी तुला दुखापत झाली होती?पूर्वी माझ्या खांद्याला दुखापत झाली होती आणि त्यात या चित्रपटाचे चित्रीकरण करताना एका ॲक्शन दृश्याच्यावेळी मी खांद्याला जोरात झटका दिला. त्यामुळे तो चांगलाच दुखावला गेला आणि त्यातच पोलिस मला काठ्यांनी मारत आहेत असे एक दृश्य होते. या दृश्यात एक काठी चूकून मला पुन्हा तिथेच लागली आणि त्यामुळे मला चांगलेच दुखायला लागले. सुरुवातीला मला हलकासा मुकामार लागला असल्याचे मला वाटले. पण खूपच त्रास होत असल्याने मला फिजिओथेरपी घ्यावी लागली.