बॉलिवूडमधील स्टारकिड हा चाहत्यांसाठी कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. स्टारकिडचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सैफ-करीनाचे तैमुर आणि जेह हे लाडके आणि लोकप्रिय स्टारकिड आहेत. आता आलिया भट आणि रणबीर कपूरची लेक राहादेखील लोकप्रिय स्टारकिडच्या पंगतीत जाऊन बसली आहे. राहाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन राहाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. एअरपोर्टवरील हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत आलिया आणि रणबीरसोबत राहा दिसत आहे. आलियाच्या कडेवर असलेली राहा पापाराझींना तिच्या गोड आवाजात बाय म्हणत असल्याचं दिसत आहे. एवढंच नाही तर त्यानंतर राहा पापाराझींना फ्लाईंग किसही देते. राहाचा हा क्यूट अंदाज पाहून आलियाला हसू आवरेनासं झाल्याचं दिसत आहे.
आलिया-रणबीरच्या लेकीच्या या व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत राहाचं कौतुक केलं आहे. "किती गोड", "ती सुपरस्टार आहे", "ही किती क्यूट आहे आणि तिचा आवाज पण गोड आहे", अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.
आलिया आणि रणबीरने १४ एप्रिल २०२२ रोजी लग्न केलं होतं. ६ नोव्हेंबर २०२२ मध्ये आलियाने राहाला जन्म दिला. राहा दोन वर्षांची आहे. तिचा दुसरा वाढदिवस नुकताच साजरा केला. राहा तिच्या क्यूट अंदाजाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असते.