Join us

मनात भीती अन् डोळ्यात आग, भावाच्या रक्षणासाठी बहिणीची धडपड; आलिया भटच्या 'जिगरा' चा दमदार ट्रेलर

By ऋचा वझे | Updated: September 25, 2024 15:34 IST

बहीण भावाच्या नात्यावर सिनेमा आधारित आहे.

वसन बाला दिग्दर्शित आगामी ॲक्शन-थ्रिलर हिंदी सिनेमा'जिगरा' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. येत्या ११ ऑक्टोबर रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे. यामध्ये आलिया भट आणि वेदांग रैना मुख्य भूमिकेत आहेत. बहीण भावाच्या नात्यावर सिनेमा आधारित आहे. करण जोहर, आलिया भट, शाहीन भट, अपूर्व मेहता आणि सोमेन मिश्रा यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे.

'जिगरा'च्या तीन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये पडद्यावर केवळ आलिया भट दिसते. प्रत्येक सीनमध्ये तिची काही ना काही धडपड सुरु असते. आलियाने यामध्ये सत्या ही भूमिका साकारली आहे. तर अभिनेता वेदांग रैना अंकुर या भूमिकेत आहे. अंकुर परदेशातील तुरुंगात अडकला आहे. तिथे त्याला अतिशय क्रुर पद्धतीने टॉर्चर केलं जात आहे. सत्याच्या खडतर बालपणानंतर तिचा भाऊ अंकुरच तिच्यासाठी सगळं काही आहे. त्यामुळे भावाला तुरुंगातून सोडवण्यासाठी आणि सुरक्षित ठिकाणी आणण्यासाठी सत्याची धडपड यामध्ये दाखवण्यात आली आहे. ॲक्शन सीन्स, इमोशनल ब्रेकडाऊन यामधून आलिया सर्वांना खिळवून ठेवते. बहीण भावामधील भावनिक सीन्ससाठी 'फुलो का तारो का...' या जुन्या लोकप्रिय गाण्याचा चांगला वापर करण्यात आला आहे. 

'जिगरा'  हा आलिया भटच्या 'इटरनल सनशाईन्स' निर्मिती अंतर्गत तिसरा सिनेमा आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन्ससोबत तिने सहनिर्मित केला आहे . वसन बाला यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून देवशिष इरेंगबम यांच्यासोबत सहलेखनही केलं आहे. सिनेमातील गाणी वरुण ग्रोवर यांनी लिहिली असून अचिंत ठक्कर यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. अभिनेता वेदांग रैनाने आलियाच्या भावाची भूमिका साकारली आहे. वेदांगने गेल्यावर्षी 'द आर्चीज' सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते.

टॅग्स :आलिया भटसिनेमाबॉलिवूड