बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटने (Alia Bhatt) वयाच्या 29 व्या वर्षी राहाला जन्म दिला. एप्रिल 2022 मध्ये रणबीर कपूरशी लग्नगाठ बांधल्यानंतर त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात ती आई झाली. प्रेग्नंसीनंतर अनेक महिला पोस्टपार्टम डिप्रेशनचा सामना करतात. मग त्या सेलिब्रिटी का असेना त्यांनाही सारख्याच प्रकारच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. आलिया भटनेही डिप्रेशनचा सामना केला. इतकंच नाही तर ती आजही दर आठवड्याला थेरेपी घेत असल्याचा खुलासा तिने केला आहे.
राहाच्या जन्मानंतर दिलेल्या मुलाखतीत आलिया म्हणाली होती की, "मी नेहमीच लोक काय म्हणतील याचा विचार केला. मी सगळं नीट मॅनेज करतेय ना की हे लोक केवळ माझ्या आनंदासाठी सांगत आहेत असं मला वाटायचं. अनेकदा स्वत:बद्दल आपण संकोच वाटून घेतो. पण मी माझ्या मानसिक स्वास्थ्यावर खूप काम करते. प्रत्येक आठवड्याला मी थेरेपी घेते जिथे मला माझ्यातील भीती मांडता येते. थेरेपीमुळे मला एक जाणवलं की आई होणं ही अशी गोष्ट नाही जी मला पाचव्या किंवा दहाव्या दिवशी समजेल. ही चिरंतन चालणारी प्रक्रिया असणार आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक दिवशी काहीतरी नवं करण्यासाठी सक्षम असणं गरजेचं आहे. कोणाकडेच सगळी उत्तरं नसतात."
प्रेग्नंसीनंतरच्या बॉडी इमेज इश्यूवर बोलताना ती म्हणाली, "मी जेव्हा थेरेपी सुरु केली तेव्हा मी त्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं. आपल्या शरीराची कशी काळजी घ्यावी, जीममध्ये जाऊन व्यायाम करावा, मला माझ्या मानसिक स्वास्थ्याचीही काळजी घ्यायची आहे हे मी ठरवलं. हे खरंतर मी लॉकडाऊनपासूनच सुरु केलं होतं. कारण मला वाटलं की स्लत:वर लक्ष देण्याची हीच योग्य वेळ आहे. वजनाला घेऊन मी नेहमीच जागरुक असायचे कारण मला माहितीये मला रोज कॅमेऱ्यासमोर उभं राहायचं आहे."
आलिया भट आगामी 'जिगरा' सिनेमात दिसणार आहे ज्याची निर्मितीही तिनेच केली आहे. शिवाय 'लव्ह अँड वॉर' या संजय लीला भन्साळींच्या सिनेमात ती रणबीर कपूर आणि विकी कौशलसोबत झळकणार आहे. तसेच अयान मुखर्जीचा 'ब्रम्हास्त्र 2'चंही शूटिंग सुरु होणार आहे.