Join us  

'अब तो बच्चन ही बनना है!' भावाची रक्षा करणाऱ्या बहिणीची गोष्ट, आलियाच्या 'जिगरा'चा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2024 12:14 PM

आलिया भटची जबरदस्त भूमिका असलेल्या 'जिगरा' सिनेमाचा ट्रेलर बातमीवर क्लिक करुन बघाच (alia bhatt, jigra)

गेल्या अनेक दिवसांपासून आलिया भटची (alia bhatt) प्रमुख भूमिका असलेल्या 'जिगरा' सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. काही दिवसांपुर्वी सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं. या पोस्टरमध्ये आलियाचा कधीही न पाहिलेला अॅक्शन अंदाज दिसला. आता नुकतंच आलियाच्या 'जिगरा' (jigra trailer) सिनेमाचा टीझर ट्रेलर भेटीला आलाय. 'अब बच्चन बनने का समय आ गया', असं म्हणणाऱ्या आलियाचा रावडी अंदाज ट्रेलरमध्ये लक्ष वेधून घेतोय. भावाचं रक्षण करणाऱ्या बहिणीची जिगरबाज गोष्ट या सिनेमातून पाहायला मिळणार हे नक्की. 

'जिगरा'च्या ट्रेलरमध्ये काय?

आलिया भटच्या 'जिगरा'चा टीझर ट्रेलर भेटीला आलाय. या ट्रेलरमध्ये सुरुवातीला आलिया एका हॉटेलमध्ये  बसलेली दिसते. तिच्यासमोर दारुचा ग्लास असतो. "आई लहानपणी गेली, बापाने स्वतःचं आयुष्य संपवलं, पुढे नातेवाईकांनी सांभाळून फक्त भाडं वसूल केलं. राहूदे ना, खूप मोठी कहाणी आहे आणि भावाकडे वेळ फार कमी आहे." असा आलियाचा संवाद सुरुवातीला दिसतो. आलिया ट्रेलरमध्ये आगीशी सामना करताना दिसते, स्वतःची नस कापायच्या तयारीत दिसते, गुंडांशी दोन हात करुन भावाची रक्षा करताना दिसते.

वेदांग रैना झालाय आलियाचा भाऊ

संपूर्ण सिनेमात डायलॉगसोबतच बॅकग्राऊंडला 'एक हजारो मेरी बहना है' गाणं वाजताना दिसतं. आलियाची सर्व उठाठेव तिच्या भावाला वाचवण्यासाठी दिसते. वेदांग रैनाने आलियाच्या भावाची भूमिका साकारलीय. वेदांगने झोया अख्तरच्या 'द आर्चीस' सिनेमातून पदार्पण केलं होतं. वेदांग - आलियाच्या भावा-बहिणीची जोडी प्रेक्षकांना कशी आवडणार, हे सिनेमा रिलीज झाल्यावरच कळेल. ११ ऑक्टोबरला सिनेमा रिलीज होणार असून वसन बाला यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय.

टॅग्स :आलिया भटबॉलिवूड