Alia Bhatt Photos Leak: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट(Alia Bhatt ) सध्या जाम संतापली आहे. केवळ तिच नाही तर संपूर्ण बॉलिवूडमध्ये संताप पाहायला मिळतोय. कारणही तसंच आहे. आलियासोबत एक खळबळजनक प्रकार घडला आहे. होय, आलियाचे घरातील फोटो लीक करण्यात आले आहेत. यामुळे आलिया खवळली आहे. केवळ तिच नाही तर अनुष्का शर्मा, अर्जुन कपूर, करण जोहर आदी कलाकारांनीही यावर संताप व्यक्त केला आहे.आलिया तिच्या लिव्हिंगरूममध्ये आरामात पहुडलेली असताना गुपचूप तिचे फोटो क्लिक केले गेलेत. हा सगळा प्रकार लक्षात आल्यावर आलियाने पापाराझी कल्चरवर भडास काढली. एक पोस्ट शेअर करत तिने आपला राग व्यक्त केला. तुम्ही मस्करी करताय का? असा संतप्त सवाल तिने केला. नेमकं काय घडलं?आलिया तिच्या लिव्हिंग रुममध्ये बसली होती. त्यावेळी तिला समोरच्या इमारतीवरील गच्चीवरुन दोन जण कॅमेरे घेऊन डोकावत असल्याचं तिला दिसलं. नंतर तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर तिने हे फोटो पोस्ट करत संबंधित प्रसारमाध्यमासह पापाराझींना जाब विचारला आहे. आलियाने लीक झालेल्या फोटोसह पोस्ट शेअर केली आहे.
तिने लिहिलं, “तुम्ही मस्करी करताय का? मी माझ्या लिव्हिंग रुममध्ये दुपारी निवांत बसले होते. अचानक कोणीतरी मला पाहतंय, असं मला जाणवलं. उठून वर बघितलं तर समोरच्या इमारतीच्या गच्चीवरुन दोन व्यक्ती कॅमेरा लावून माझ्याकडे पाहत होते. हा प्रकार कोणत्या जगात मान्य आहे आणि हे असं करणं कितपत योग्य आहे? एखाद्याच्या खासगी आयुष्यात डोकावणं अत्यंत वाईट गोष्ट आहे. प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते, जी तुम्ही ओलांडू शकत नाही. मी हे बोलतेय कारण तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या आहात...” आलियाने या पोस्टमध्ये मुंबई पोलिसांनाही टॅग केलं आहे.
बॉलिवूडकर संतापले...आलियाच्या पोस्टनंतर अनेक बॉलिवूडकरांनी संताप व्यक्त केला आहे. अनुष्का शर्माने हा संपूर्ण प्रकार संतापजनक असल्याचं म्हटलं आहे. हे लज्जास्पद आहे. या लोकांना वारंवार विनंती केल्यानंतरही यांनी आमच्या मुलीचे फोटो शेअर केले होते, असं अनुष्काने म्हटलं आहे. जान्हवी कपूर हिनेही राग व्यक्त केला आहे. हा अतिशय घाणेरडा प्रकार आहे. यांनी माझ्यासोबतही असाच प्रकार केला होता. जिथे आमचे फोटो घेतले जाणार नाहीत, अशी कुठली जागा आहे? अशा शब्दांत तिने आपला संताप बोलून दाखवला आहे.
अर्जुन कपूर यानेही अशाच आशयाची प्रतिक्रिया दिली आहे. लज्जास्पद, एक महिला आपल्या घरात सुरक्षित नसेल तर तुम्ही सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत, असं त्याने म्हटलं आहे. करण जोहर यानेही प्रतिक्रिया नोंदवली आहे. यावर काहीही स्पष्टीकरण देता येणार नाही. हे पूर्णपणे खासगीपणाचं उल्लंघन आहे. काहीतरी मर्यादा असायला हवी, असं त्याने म्हटलं आहे.