संजय लीला भन्साळींच्या (Sanjay Leela Bhansali) ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) या सिनेमाची प्रेक्षकांना दीर्घकाळापासून प्रतीक्षा होती. अखेर तो क्षण आला. आलिया भटचा हा सिनेमा आज रिलीज झाला. आता हा सिनेमा कसा आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना असणारच. तर स्वत:ला बॉलिवूडचा सर्वात मोठा समीक्षक म्हणवणारा अभिनेता कमाल आर खान (Kamaal R Khan) अर्थात केआरकेचा (KRK) रिव्ह्यूही आला आहे. एकापाठोपाठ एक ट्विट करत, केआरकेने या चित्रपटाची जोरदार खिल्ली उडवली आहे.
‘ माझ्या काही मित्रांनी गंगूबाई काठियावाडी चित्रपट पाहिलाये आणि चित्रपट पाहायला जाताना सोबत एक पेनकिलर घेऊन जा, असा सल्ला त्यांनीच मला दिला होतो. मी चित्रपट पाहायला जातोय आणि सोबत पॉकेटमध्ये दोन पेनकिलर घेतल्या आहेत...,’ असं पहिलं ट्विट केआरकेनं केलं.
पहिल्या ट्विटनंतर काही तासांनी केआरकेनं दुसरं ट्विट केलं आणि यावेळी पहिल्या हाफचा रिव्ह्यू देत त्याने एक व्हिडीओ शेअर केला. ‘संपूर्ण जगात युद्धाचं वातावरण आहे आणि युद्ध तर तुम्ही आणि मी युद्ध लढत आहोत. गंगुबाई काठियावाडी पाहायला गेलो आणि आई शप्पथ फर्स्ट हाफ पूर्ण पाहिला आणि माझ्या डोक्याचा पार भुगा झाला. सेकंड हाफ पाहायला कसा जाऊ, हेच मला कळत नाहीये. कारण सेकंड हाफ पाहणं म्हणजे रशिया-युक्रेन युद्धासारखं आहे. माझ्यासाठी हे युद्ध आहे, पण मी हे युद्ध लढणार आहे. 2 नाही 4पेन किलर घ्याव्या लागल्या तरी मी चित्रपट पूर्ण बघेन. मी प्रामाणिकपणे चित्रपट पाहतो आणि नंतर रिव्ह्यू देतो, चांगला असेल तर मी चांगला सांगतो आणि वाईट असेल तर वाईट. पण सेकंन्ड हाफ पाहायला जाताना मला भीती वाटतेय. अर्थात वेडा झालो किंवा रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली तरी चालेल पण चित्रपट नक्की बघणार...,’ असं तो या व्हिडीओत म्हणतोय.
तिसऱ्या ट्विटमध्ये त्याने फायनल रिव्ह्यू दिला आहे. मी गंगूबाई काठियावाडी पाहिला आणि हा एक बकवास सिनेमा आहे,असं त्याने म्हटलंय.
आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला ‘गंगूबाई काठियावडी’ हा चित्रपट मुंबईतील कमाठीपुराच्या माफिया क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगूबाई यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केलं आहे.