वरूण धवन व आलिया भट्ट या आॅनस्क्रीन जोडीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, एका सुपरहिट चित्रपटाच्या रिमेकमध्ये वरूण व आलियाची जोडी जवळजवळ फायनल झाली आहे. अर्थात अद्याप याची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.आता हा सुपरहिट चित्रपट कुठला, हे जाणून घेण्यास तुम्ही उत्सूक असाल. तर हा चित्रपट आहे, ‘कुली नंबर 1’. होय, १९९५ साली रिलीज झालेल्या ‘कुली नंबर 1’ने धूम केली होती. या चित्रपटाची गाणी तर लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली होती. चित्रपटातील गोविंदा व करिश्मा कपूरच्या जोडीनेही धम्माल केली होती. याच ‘कुली नंबर 1’चा रिमेक प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.
या चित्रपटातून वरूण व आलियाची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. आधी यात सारा अली खान दिसणार, अशी चर्चा होती. पण आता साराच्या जागी आलियाची वर्णी लागल्याची चर्चा आहे. ही चर्चा खरी ठरली तर ‘कुली नंबर 1’चा रिमेकही सुपरहिट ठरणार, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. हा रिमेक वरूणचा भाऊ रोहित धवन प्रोड्यूस करणार आहे. तर वरूणचे पापा डेव्हिड धवन याचे दिग्दर्शक असतील.