बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar) ७ वर्षांनी पुन्हा दिग्दर्शकाच्या खुर्चीवर बसत 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) सिनेमा आणला. सध्या सिनेमाला भरघोस प्रतिसाद मिळतोय. टिपीकल करण जोहर स्टाईलचाच हा सिनेमा आहे. फॅमिली ड्रामा, गाणी, कॉमेडी आणि रोमान्सने भरलेल्या या सिनेमाची स्टारकास्टही तेवढीच तगडी आहे. आलिया भट आणि रणवीर सिंग हे आजच्या पिढीचे कलाकार तर धर्मेंद्र, शबाना आजमी आणि जया बच्चन या दिग्गज कलाकारांची मांदियाळी यामध्ये आहे. कालच सिनेमाच्या यशानिमित्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा पडद्यामागच्या अनेक गोष्टी कलाकारांनी सांगितल्या.
'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ची मुख्य अभिनेत्री आलिया भटचा लुक प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस पडला. तिने यामध्ये बंगाली कुटुंबातील मुलीची भूमिका केली आहे. स्टायलिश साड्यांमध्ये आलिया खूपच सुंदर दिसली आहे. सिनेमाच्या शेवटी आलिया भट आणि रणवीर सिंगच्यालग्नाचा सिक्वेन्स शूट करण्यात आला आहे. गंमत म्हणजे आलिया खऱ्या आयुष्यात ज्या दिवशी लग्नबंधनात अडकली त्याच्या चार दिवसातच तिने सिनेमातील लग्नाचा सीन शूट केला. त्यामुळे आलियाने एकाच आठवड्यात दोन वेळा लग्न केले.
आलिया म्हणाली, 'आत्ता तुम्ही जे गाणं पाहिलंत यात जो लग्नाचा सिक्वेन्स शूट करण्यात आला आहे. खरं तर हे शूट त्याच आठवड्यात झालं ज्या आठवड्यात मी रणबीर कपूर सोबत लग्नबंधनात अडकले. खऱ्या आयुष्यात लग्न केल्यानंतर ४ दिवसांनीच आम्ही हे शूट केलं होतं. एकाच आठवड्यात माझं लग्न रील आणि रिअल लाईफमध्ये झालं.दोन्हीमध्ये खूप फरक होता.'
आलिया आणि रणबीर कपूर 14 एप्रिल 2022 रोजी लग्नबंधनात अडकले. मुंबईतल्या राहत्या घरीच त्यांचा लग्नसोहळा पार पडला. तर लग्नानंतर चारच दिवसांनी आलियाने रॉकी और रानी च्या राहिलेल्या भागाचं शूट पूर्ण केलं. तेव्हा रील लाईफमध्ये तिने रणवीर सिंगसोबत लग्न केलं. त्यामुळे एकाच आठवड्यात आलिया रणबीर आणि रणवीर दोघांसोबत लग्नबंधनात अडकली होती. विशेष म्हणजे आलिया यावेळी प्रेग्नंटही होती. मुलीला जन्म दिल्यानंतर आलियाने सिनेमातील 'तुम क्या मिले' हे गाणं शूट केलं होतं.