बायकॉट ट्रेंडने आधीच बॉलिवूडकरांचं टेन्शन वाढवलं असताना आता रणबीर कपूर ( Ranbir Kapoor ) व आलिया भटचा (Alia Bhatt ) ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastara) हा सिनेमा बायकॉट ट्रोल आर्मीच्या निशाण्यावर आला आहे. सोशल मीडियावर #आलिया_My_Foot ट्रेंड होताना दिसत आहे. या ट्रेंडमागे एक नाही तर अनेक कारणं असल्याचं म्हटलं जात आहे.
का ट्रेंड होतोय #आलिया_My_Foot ?ट्वीटरवर अचानक #आलिया_My_Foot ट्रेंड का होतोय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर यामागचं कारण आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेली एक पोस्ट. होय, आलिया आणि रणबीरने पाकिस्तानी पुरग्रस्तांना आर्थिक मदत केल्याची पोस्ट व्हायरल झाली आणि नेटकरी बिथरले.
‘ब्रह्मास्त्र’चा निर्माता करण जोहरने पाकिस्तानी पूरग्रस्तांना 5 कोटी आणि आलिया व रणबीरने प्रत्येकी 1 कोटी रूपये मदत केल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. इतकंच नाही तर ‘ब्रह्मास्त्र’ हिट झाल्यावर रणबीर-आलियाने पाकिस्तानी पुरग्रस्तांना 51 कोटी देणार असल्याचं वचन दिलं असल्याचा मोठा दावाही या पोस्टमध्ये केला गेला आहे. बॉलिवूड नेहमी माणूसकीचा धर्म जपत आला आहे, असंही या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ही पोस्ट व्हायरल झाली आणि आलिया नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली. क्षणात चिडलेल्या, संतापलेल्या लोकांनी ट्वीटरवर #आलिया_My_Foot चा ट्रेंड सुरु केला.
ट्वीटरवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या. ‘भारतातून कमावतात आणि पाकिस्तानवर खर्च करतात,बॉयकॉट बॉलीवूड,’अशी कमेंट एका चाहत्याने केली. ‘भारतात पूर येतो तेव्हा हे बॉलिवूडकर कुठे असतात ? गेल्या महिन्यात बिहार,आसाममध्ये पुरानं सगळंच उद्ध्वस्त केलं तेव्हा कुठे होते हे लोक?’ असा सवाल एका युजरने केला.
काय आहे सत्य?
आलिया व रणबीरने पाकिस्तानी पूरग्रस्तांना मदत केल्याची पोस्ट खरं तर पूर्णपणे फेक आहे. बीबीसी हिंदी हँडलची पोस्ट म्हणून ती शेअर करण्यात आली आहे. पण बीबीसी हिंदीने अशी कुठलीही पोस्ट शेअर केल्याचा इन्कार केला आहे. ही पोस्ट फेक असल्याचंही बीबीसी हिंदीने स्पष्ट केलं आहे. अर्थात याऊपरही लोक मानायला तयार नाहीत. पोस्ट खरी असो की खोटी आम्ही ‘ब्रह्मास्त्र’ बायकॉट करणारच, अशी भूमिका आता बायकॉट गँगने घेतली आहे.
‘ब्रह्मास्त्र’ सिनेमा येत्या 9 सप्टेंबर रोजी रिलीज होत आहे. या सिनेमात रणबीर कपूर,आलिया भट्ट व्यतिरिक्त अमिताभ बच्चन,मौनी रॉय देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.