बॉलिवूडमधील दिग्गज कुटुंबांपैकी एक समजल्या जाणाऱ्या बच्चन कुटुंबामध्ये सध्या सारंकाही आलबेल नाही आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या द आर्चिजच्या प्रीमियरपासून या चर्चांना अधिकच बळ मिलाले आहे. या चित्रपटामधून अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा हा त्याच्या कारकिर्दीची सुरुवात करत आहेत. या प्रीमियरचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओंबाबत सांगण्यात येत आहे की, या प्रीमियरदरम्यान जया बच्चन आणि श्वेता नंदा ह्या ऐश्वर्या रॉयकडे सातत्याने दुर्लक्ष करत होत्या. त्याशिवाय या कार्यक्रमानंतर ऐश्वर्या रॉय-बच्चन ही अमिताभ बच्चन यांच्या फॉलोलिस्टमध्येही दिसलेली नाही. त्यामुळे ऐश्वर्या रॉय हिला अमिताभ बच्चन यांनी अनफॉलो केल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर आता अमिताभ बच्चन यांचं एक ट्विटही व्हायरल होत आहे.
या ट्विटमधून अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या चाहत्यांमध्ये खळबळ माजवली आहे. या ट्विटसह अमिताभ बच्चन यांनी त्यांचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटोही शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये अमिताभ बच्चन आपल्याच विचारात हरवल्याचं दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांचा हा फोटो कौन बनेगा करोडपतीच्या सेटवरील आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.
हा फोटो शेअर करताना अमिताभ बच्चन यांनी फोटोसोबत लिहिलं आहे की, सर्व काही सांगून झालं आहे. सर्व काही करून झालं आहे. जे करायचं होतं ते केलंय. जे केलं ते केलं, असं या फोटोखाली लिहिलं आहे. आता अमिताभ बच्चन यांचे चाहते या पोस्टमागचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. काही जणांच्या मते अमिताभ बच्चन यांनी ही पोस्ट सूनी ऐश्वर्या रॉय हिला उद्देशून लिहिली असून, त्यातून त्यांनी सुनेबाबतच्या नाराजीकडे इसारा केला आहे. मात्र या अफवा पसरत असताना अमिताभ बच्चन किंवा त्यांच्या कुटुंबातील कुणीही आतापर्यंत याबाबत कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
अमिताभ बच्चन हे इन्स्टाग्रामवर सुमारे ७४ जणांना फॉलो करतात. त्यामध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचा समावेश आहे. मात्र द आर्चिजच्या प्रीमियरपूर्वी अमिताभ बच्चन हे ऐश्वर्या रॉयला फॉलो करत होते की नाही याबाबत संभ्रम आहे. काही जणांनी दावा केला आहे की, अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या रॉय हे इन्स्टाग्रामवर एकमेकांना कधीही फॉलो करत नव्हते.