चार बायका आणि शेकडो दासी ठेवणारा अल्लाउद्दीन खिलजी होता समलिंगी?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 10:12 AM
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटात दिल्ली सल्तनतचा बादशाह अल्लाउद्दीन मोहम्मद खिलजी याच्या भूमिकेवरून सध्या देशभर ...
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटात दिल्ली सल्तनतचा बादशाह अल्लाउद्दीन मोहम्मद खिलजी याच्या भूमिकेवरून सध्या देशभर वाद निर्माण झाला आहे. राणी पद्मावती यांची जी सर्वांत लोकप्रिय कथा आहे, ती कथा मलिक मोहम्मद जायसी यांच्या ‘पद्मावत’ या रचनेवर आधारित आहे. जायसी यांची ‘पद्मावत’ मेवाडची राणी पद्मावती हिला मिळविण्यासाठी खिलजीने केलेल्या आक्रमणांवर आधारित कथा आहे. राणी पद्मावतीचे पती आणि मेवाडचे राजे रतन सिंग यांना युद्धभूमीत वीरगती प्राप्त होते, तर राणी पद्मावती या खिलजीपासून वाचण्यासाठी अग्नीला शरण जातात. अशा पद्धतीने खिलजी युद्ध जिंकूनही राणी पद्मावतीला प्राप्त करू शकत नाही. बरेचसे लोक ‘पद्मावत’ची कथा काल्पनिक असल्याचे म्हणतात. भन्साळींच्या चित्रपटात अशाच स्वरूपाची कथा दाखविण्यात आल्याचे बोलले जात असले तरी, वास्तव काय आहे हे चित्रपट रिलीज झाल्यानंतरच समोर येणार आहे. असो, आज आम्ही खिलजीच्या जीवनाशी संबंधित काही तथ्य सांगणार आहोत, ज्याची इतिहासामध्ये नोंद आहे. अल्लाउद्दीन खिलजी यांचा जन्म केव्हा झाला याबाबतचे योग्य तपशील उपलब्ध नाहीत. काही इतिहासकारांच्या मते त्याचा जन्म सन १२५० मध्ये झाला. मात्र १६- १७च्या दशकातील लेखक हाजी-उद-दबीर यांनी लिहून ठेवले की, खिलजी जेव्हा ३४ वर्षांचा होता, तेव्हा त्याने रणथंभोरवर हल्ला केला होता. खिलजीने सन १३०० ते ०१ च्या दरम्यान रणथंभोवर हल्ला केला होता. या आधाराच्या निकषावर असे म्हटले जाते की, त्याचा जन्म १२६६ ते ६७ दरम्यान झाला असावा. खिलजीचे खरे नाव अली गुरशस्प असे होते. खिलजी वंशाचे पहिले शासक जलालुद्दीन खिलजी त्याचे काका होते. जलालुद्दीन खिलजीने मुलगी मल्लिका-ए-जहांचे लग्न पुतण्या अल्लाउद्दीन खिलजी याच्याशी करून दिले होते. जलालुद्दीन सन १२९१ मध्ये अल्लाउद्दीनला उत्तर प्रदेशातील काही साम्राजाचा अमीर म्हणून नियुक्त केले होते. मात्र अल्लाउद्दीनला केवळ ‘अमीर’ या पदापर्यंतच मर्यादित राहायचे नव्हते. तो प्रचंड महत्त्वाकांक्षी होता. त्याने निश्चिय केला की, काका तसेच सासरा असलेल्या जलालुद्दीनची जागा घ्यायची. पुढे त्याने सन १२९६ मध्ये जलालुद्दीनची कपटीपणाने हत्या करीत स्वत:ला दिल्ली साम्राज्याचा सुलतान घोषित केले. या पद्धतीने १२९६मध्ये खिलजी वंशाचा दुसरा शासक बनला. खिलजी १३१६ पर्यंत म्हणजेच त्याच्या मृत्यूपर्यंत दिल्लीचा सुलतान राहिला. खिलजीची पहिली पत्नी मल्लिका-ए-जहां त्याचा काका आणि खिलजी वंशाचा पहिला संस्थापक जलालुद्दीनची मुलगी होती. असे म्हटले जाते की, मल्लिका अल्लाउद्दीनला फारसे जुमानत नव्हती, त्यामुळे दोघांमध्ये म्हणावे तसे चांगले संबंध नव्हते. अल्लाउद्दीनची दुसरी पत्नी महरू होती. जी त्याच्या सेनापती अलप खानची बहीण होती. अल्लाउद्दीनने अलप खान याचीही हत्या केल्याची शंका व्यक्त केली जाते. खिलजीची तिसरी पत्नी गुजरातच्या वाघेला राजा कर्णची विधवा पत्नी कमला होती. खिलजीची चौथी पत्नी देवगिरीचे राजा रामचंद्रची मुलगी क्षत्यपली होती. खिलजीच्या सैन्याने रामचंद्र यांचा पराभव करून त्यांना शरण जाण्यास भाग पाडले होते. या व्यतिरिक्त खिलजीच्या राजवाड्यात शेकडो महिला दासी म्हणून राहत होत्या. अल्लाउद्दीन खिलजी आणि मलिक काफूर यांच्यातील नात्याबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. अल्लाउद्दीन खिलजीचा काफूरवर त्याच्या कोण्याही नातेवाईक आणि मित्रांच्या तुलनेत अधिक विश्वास होता. मात्र दोघांमध्ये समलैंगिक संबंध असल्यावरून इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. मलिक काफूरने अल्लाउद्दीन खिलजीसाठी दक्षिण भारतातील अनेक राजांबरोबर युद्ध केले. त्यातील बºयाच युद्धांमध्ये विजयही मिळविला. असे म्हटले जाते की, खिलजीचा सेनापती नुसरत खानने गुजरातच्या एका युद्धानंतर मलिक काफूरला एका गुलाम बाजारातून खरेदी केले होते. मात्र आपल्या धाडस आणि स्वामीभक्तीमुळे तो खिलजीचा डावा हाथ बनला होता. अल्लाउद्दीनच्या मृत्यूच्या काही दिवसांनंतरच मलिक काफूरचीही हत्या करण्यात आली होती.