अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा’ (Pushpa) हा सिनेमा अजूनही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. अगदी सिनेमा रिलीज होऊन दीड महिना झाला. पण सिनेमाची क्रेझ अद्यापही कायम आहे. ‘पुष्पा नाम सुन के फ्लॉवर समझा क्या, फायर हूं मै’ अशा सिनेमांच्या डायलॉग्सनी तर धूम केली आहे. हिंदीतील या डायलॉग्समागे एका मराठमोळ्या अभिनेत्याचा आवाज आहे, हे तुम्हाला ठाऊक आहेच. या अभिनेत्याचे नाव आहे श्रेयस तळपदे (Shreyas Talpade). ‘पुष्पा’च्या निमित्ताने श्रेयसने ‘लोकमत फिल्मी’ मनमोकळ्या गप्पा मारल्या. डबिंग आर्टिस्ट म्हणून रिजेक्शन ते ‘पुष्पा’ला दिलेला आवाज हा खास प्रवास श्रेयसने सांगितला.
रिजेक्शन ते अल्लू अर्जुनचा आवाज...करिअरच्या सुरूवातीला पैसे नसायचे. तेव्हा आम्ही प्रयत्न करायचो की कुठून पॉकेटमनी मिळवता येईल का? कुणीतरी डबिंग आर्टिस्ट म्हणून ट्राय कर, असा सल्ला दिला. मी डबिंगचं ऑडिशनला गेलो. तिथे ते डबिंग कोऑर्डिनेटर होते, त्यांनी ते ऐकलं आणि हा मैं बताता हू... असं काहीतरी बोलले. ते ऐकून मला वाईट वाटलं होतं. पण तेव्हा काही मैंने ठान लिया है..., असं वगैरेकाही नव्हतं, असा एक किस्सा श्रेयसने ऐकवला.
‘पुष्पा’ का स्वीकारला?‘पुष्पा’ हा एक पॅन इंडिया सिनेमा आहे. तो हिंदीत त्यांना रिलीज करायचा होता आणि त्यांना अल्लू अर्जुनच्या आवाजासाठी एका लोकप्रिय कलाकालाचा आवाज हवा होता. ‘पुष्पा’आधी मी ‘लायन किंग’च्या एका कॅरेक्टरला आवाज दिला होता. ‘पुष्पा’ची ऑफर आली तेव्हा प्रयत्न करायला काय हरकत आहे,असं मला वाटलं. अॅक्टर म्हणून असं कॅरेक्टर मी कधी केलं नव्हतं. पण अशा कॅरेक्टरला आवाज देण्याची संधी मिळाली तर मी काय करू शकतो, असा विचार मी केला. आमच्या डबिंग डायरेक्टरशी मी बसलो. कसा आवाज चांगला वाटेल, याचे काही प्रयोग आम्ही केले. यानंतर आवाजाचे काही सॅम्पल दिग्दर्शक सुकूमार यांना पाठवले गेलेत. कदाचित अल्लू अर्जुननेही ते ऐकलेत आणि हे चांगलं वाटतंय, असं म्हणून त्यांनी होकार कळवला.
ट्रेलर आला आणि मला प्रेशर आलं...हा सिनेमा डब करताना आम्ही खूप धम्माल केली. मला स्वत:ला खूप मज्जा आली. कारण अल्लू अर्जुनने जे काही काम केलं आहे, ते एकदम मस्त केलंय. छोट्या छोट्या गोष्टी त्याने ज्या पद्धतीने व्हेरिएट केल्या आहेत, त्या डब करताना मला मजा आली. त्या सगळ्यानंर ट्रेलर आला आणि मला प्रेशर आलं. कारण कारण कलाकारांनी ट्रेलर ट्विट केला. नशिबानं ट्रेलरपासूनच खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. खरं तर आधी खूप लोकांना कळलंच नव्हतं की माझा आवाज आहे. त्यांचा विश्वासचं बसला नव्हता की हा सिनेमा मी डब केलाये, असं श्रेयस म्हणाला. आज मी खूप आनंदी आहे. डबिंगसाठी माझं इतकं कौतुक होईल, असा विचार मी केला नव्हता. प्रत्येक कलाकार प्रेमाचा भुकेला असतो आणि ते मिळाल्यावर यापेक्षा वेगळं काय हवं?, असं तो म्हणाला.
क्लासमॅक्स डब करणं कठीण होतं..‘पुष्पा’चा क्लायमॅक्स सीन करणं माझ्यासाठी कठीण होता. क्लायमॅक्स एका लाईट नोटवर सुरू होतो आणि हळूहळू त्याचा गीअर चेंज व्हायला लागतो. त्याचं वेगळंच रूप दिसते. अल्लू अर्जुनचा हा सीक्वेन्स करणं माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं, असं श्रेयसने सांगितलं.
कुठल्याही कलाकाराला हे चॅलेंज आवडतात...अल्लू माझा आवडता स्टार आहे. मला त्याला आवाज देताना आनंद वाटला. साऊथमध्ये खूप गुणी कलाकार आहेत. साऊथच्या आणखी काही सिनेमांना आवाज देण्याची संधी मिळाली तर ती घ्यायला मला नक्कीच आवडेल. एका कलाकाराचे पडद्यावरचे इमोशन्स आवाजातून पुन्हा एकदा रिक्रिएट करायचे आहेत, मला वाटतं कुठल्याही कलाकाराला हे चॅलेंज आवडतात, असं श्रेयस म्हणाला.
‘पुष्पा 2’मध्येही पुन्हा एकदा श्रेयस?‘पुष्पा’चा दुसरा पार्ट अर्थात ‘पुष्पा 2’लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. हा सिनेमाही हिंदीत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘पुष्पा 2’मध्ये पुन्हा एकदा श्रेयसचा आवाज ऐकायला मिळणार का? असं विचारलं असता, मला ते आवडेल, पण अद्याप तसं काही ठरलेलं नाहीये, असं श्रेयसने स्पष्ट केलं.