तेलंगणा उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर आज सकाळी साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनची हैदराबाद सेंट्रल जेलमधून सुटका करण्यात आली. अभिनेत्याचे वडील अल्लू अरविंद आणि सासरे कंचरला चंद्रशेखर त्याला घेण्यासाठी आले होते. अल्लू अर्जुनचे चाहते खूप खूश आहेत. जेलमधून सुटल्यानंतर अल्लू अर्जुन आपल्या कुटुंबासह घरी पोहोचला आहे. घरी पोहोचल्यावर त्याने प्रेम आणि सपोर्टसाठी सर्व चाहत्यांचे आभार मानले.
जेलमधून बाहेर आल्यानंतर अल्लू अर्जुनने मीडियाशी संवाद साधला. तो म्हणाला - "काळजी करण्यासारखं काही नाही. मी ठीक आहे. माझा कायद्यावर विश्वास आहे. हे प्रकरण कोर्टात सुरू आहे त्यामुळे मी यादरम्यान काहीच भाष्य करणार नाही. मी कायद्याचं पालन करणारा नागरिक आहे. पोलिसांना सहकार्य करेन."
"जीव गमावलेल्या महिलेच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना आहेत. ही दुर्दैवी घटना होती. कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्यासाठी मी कायम असेन. सर्वांच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्या पाठिंब्यामुळे मी आज येथे आहे. मला माझ्या चाहत्यांचे आभार मानायचे आहेत." जेलमधून बाहेर आल्यानंतर अल्लू अर्जुन घरी पोहोचण्यापूर्वी Geetha Arts च्या ऑफिसमध्ये पोहोचला.
४ डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये 'पुष्पा २' च्या स्पेशल स्क्रिनिंगदरम्यान चेंगराचेंगरीमुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला होता. या प्रकरणी काल अभिनेता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. अल्लू अर्जुनला १४ दिवसांच्या कोठडीत दिली. तेलंगणा उच्च न्यायालयाने त्यानंतर अभिनेत्याला ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला. पण यानंतरही त्याला रात्र जेलमध्ये काढावी लागली.