बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने (Shahrukh Khan) 'पठाण' सिनेमातून बॉक्सऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. ४ वर्षांनंतर शाहरुखने कमबॅक करत तोच किंग असल्याचं दाखवून दिलं. पठाणच्या यशानंतर शाहरुख आगामी 'जवान' या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. जवान मधूनही शाहरुख आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज आहे. 'जवान' साऊथ अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. दरम्यान आता साऊथचा एक सुपरस्टार 'जवान' मध्ये कॅमिओ करण्याची शक्यता आहे. हा सुपरस्टार दुसरा तिसरा कोणी नसून 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुन (Allu Arjun) आहे.
अल्लू अर्जुनला 'जवान'ची ऑफर
शाहरुख खान 'जवान'च्या शूटिंगसाठी चेन्नईमध्ये आहे. यावेळी त्याने कोस्टार नयनताराच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता जवानची उत्सुकता आणखी ताणली आहे. कारण सिनेमात पुष्पा फेम 'अल्लू अर्जुन' कॅमिओ करणार आहे. या कॅमिओ रोलसाठी अल्लू अर्जुनला विचारणा करण्यात आली आहे. फिल्म क्रिटिक सुमीत केदार यांनी पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.
शाहरुख आणि अल्लू अर्जुन एकत्र दिसणार म्हणजे मोठ्या पडद्यावर धमाल बघायला मिळणार यात काही शंका नाही. या कॅमिओ मुळे अल्लू अर्जुनचे हे बॉलिवूडमध्ये पदार्पणच असणार आहे. त्यामुळे दोन्ही स्टार्सचे चाहते आता उत्सुक आहेत.
‘जवान’चे दिग्दर्शन अरुण कुमार उर्फ ॲटली हे करणार असून या चित्रपटात समंथा प्रभू ही प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री काम करणार होती. मात्र, तिच्याऐवजी नयनतारा या अभिनेत्रीला संधी मिळाली आहे. तिचा हा पहिला हिंदी सिनेमा असेल. या शिवाय, प्रियामणी, सुनील ग्रोवर, सान्या मल्होत्रा आणि योगी बापू हे कलाकार असणार आहेत. तसेच फ्लॅशबॅकमध्ये दीपिका पदुकोण हिचा कॅमिओ असेल. तर आता अल्लू अर्जुनचाही कॅमिओ दिसणार आहे. ॉ