Allu Arjun Transformation Video: दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदानाच्या ‘पुष्पा’ (Pushpa) या सिनेमानं देशातच नाही तर अख्ख्या जगात धुमाकूळ घातला. ‘बाहुबली’नं धूम केली होती, अगदी तशीच धूम ‘पुष्पा’नं केली. अजूनही ‘पुष्पा’ ट्रेंडमधये आहे. सर्वत्र पुष्पाचीच चर्चा आहे. सिनेमाची गाणी, डायलॉग यावरचे रिल्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
‘पुष्पा’तील अल्लू अर्जुनने साकारलेली भूमिका भलतीच हिट झाली आहे. त्याचं खांदा वाकून चालणं, दाढीवरून हात फिरवणं सगळंच चाहत्यांच्या पसंतीत उतरलं आहे. साहजिकच यासाठी अल्लू अर्जुनने खूप परिश्रम घेतले. अल्लूने ‘पुष्पा’साठी कशी तयारी केली, याचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. अल्लू अर्जुन ते पुष्पाराज हे ट्रान्सफॉर्मेशन दाखवणारा हा व्हिडीओही तुफान व्हायरल होतोय.
‘पिंकविला’च्या व्हिडीओत अल्लू अजुृन एका महागड्या अलिशान गाडीतून उतरतो. यानंतर त्याच्या व्हॅनिटीत वळतो. येथे हेअरस्टाइलिस्ट आणि मेकअप आर्टिस्ट आधीच हजर असतात. कॉफी पोटात रिचवत रिचवत अर्जुन मेकअपसाठी त्यांच्यासमोर बसतो आणि काहीच वेळात अल्लू अर्जुनचा अख्खा लूक बदलतो. तो पुष्पाराज बनवतो. सरतेशेवटी दाढीवर पुष्पा स्टाईल हात फिरवत अल्लू अर्जुन स्वत:ला आरशात बघतो.
पुष्पा: द राइज हा चित्रपट गेल्या 17 डिसेंबरला प्रदर्शित झाला आणि बघता बघता या चित्रपटानं बॉक्स ऑफिसचा कब्जा घेतला. अल्लूच्या या सिनेमापुढे बॉलिवूडचे सिनेमेही फेल ठरले. कोरोना काळातही पुष्पाने बक्कळ कमाई केली. अगदी कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले. जगभरात 350 कोटी हून अधिकचा गल्ला या चित्रपटाने जमवला. त्यामुळे अल्लू अर्जुन आणि पुष्पा पुन्हा एकदा ट्रेंड होत आहे.चित्रपटात अल्लू अर्जुन एका चंदन तस्कराच्या भूमिकेत आहे. एक मजूर म्हणून काम करणारा पुष्पराज पुढे पॉवरफूल बनण्यासाठी चंदनाची तस्करी सुरू करतो, असं यांचं कथानक आहे.