बॉलिवूडमधील सुपरहिट सिनेमांपैकी एक म्हणजे सलमान खानचा (Salman Khan) 'बजरंगी भाईजान'. या सिनेमाने प्रेक्षकांना हसवलं आणि रडवलंही. उत्तम कथा, अभिनय, गाणी, दिग्दर्शन यामुळे हा सिनेमा सर्वांनाच आवडला यात शंका नाही. प्रेक्षक चिमुकल्या मुन्नीच्या प्रेमातच पडले. सलमानने साकारलेली पवन कुमारची भूमिका आजही लक्षात आहे. पण सलमानच्या जागी सिनेमात दुसरा कोणता अभिनेता असता तर याची आपण कल्पनाही करु शकत नाही. खरंतर कबीर खानने 'बजरंगी भाईजान'ची ऑफर सलमान खानआधी एका साऊथ अभिनेत्याला दिली होती.
सध्या साऊथ सुपरस्टार्सचा हिंदीतही बोलबाला आहे. अल्लू अर्जुन, रामचरण, विजय देवरकोंडा, ज्युनिअर एनटीआर या अभिनेत्यांनी हिंदी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 'पुष्पा' सिनेमातून अभिनेता अल्लू अर्जुनने इतिहास रचला. यासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.हा पुरस्कार पटकावलेला तो पहिला तेलुगू अभिनेता आहे. अल्लू अर्जुनने खरंतर २०१५ मध्येच बॉलिवूड डेब्यू केलं असतं. मात्र त्याने नकार दिला. कबीर खानने 'बजरंगी भाईजान'ची ऑफर आधी अल्लू अर्जुनला दिली होती. मात्र तेव्हा तो तेलुगू सिनेमा 'अला वैकुंठपुरमुलू' सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त होता. याच कारणाने त्याने बजरंगी भाईजान करण्यास नकार दिला होता. यानंतर हा सिनेमा सलमान खानला ऑफर झाला.
अल्लू अर्जुनला साऊथ आणि हिंदी दोन्ही सिनेसृष्टीत खूप भाव आहे. एखाद्या बड्या सिनेमाला नकार देणं हे त्याने पहिल्यांदा केलेलं नाही. त्याने साऊथमध्येही अनेक बडे बजेटचे सिनेमे नाकारले आहेत. 'पुष्पा' च्या ब्लॉकबस्टर यशानंतर त्याच्या बॉलिवूड डेब्यूची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.