Join us

अल्लू अर्जुन सोबत साउथचे हे ४ कलाकार आहेत रिअल लाइफ सुपरस्टार; कुणी घेतलंय गाव दत्तक, तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2022 7:55 PM

साउथ सिनेइंडस्ट्रीतील अनेक मोठे कलाकार रील तसेच रिअल लाइफ सुपरस्टार आहेत.

साउथ सिनेमांचा ट्रेंड वाढल्यानंतर आता या इंडस्ट्रीतील कलाकारांना देशभरात पसंती मिळत आहे. हे कलाकार त्यांच्या इंडस्ट्रीचे सुपरस्टार आहेत पण तुम्हाला माहिती आहे का की साउथ सिनेमातील अनेक मोठे कलाकार रील तसेच रिअल लाइफ सुपरस्टार आहेत. यामध्ये असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी सर्वसामान्यांना मोकळेपणाने मदत केली आहे. आज अशा सुपरहिरोंबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

नागार्जुन (Nagarjun)

 

नागार्जुनची गणना दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रतिष्ठित अभिनेत्यांमध्ये केली जाते. त्याने आपल्या चित्रपटांद्वारे चाहत्यांचे खूप प्रेम मिळवले आहे. नागार्जुनने अलीकडेच हैदराबाद-वारंगल महामार्गावरील उप्पल-मेडिपल्ली भागातील चेंगीचेर्ला फॉरेस्ट ब्लॉकमधील १०८० एकर जंगल दत्तक घेतले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हे उदात्त कार्य केले. नागार्जुनने जंगल दत्तक घेण्यासोबतच जंगलाच्या विकासासाठी २ कोटी रुपयांची देणगीही दिली आहे.

विशाल (Vishal)

 

विशालच्या अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांच्या हिंदी डबने रसिकांना वेड लावले आहे. त्याचा स्वभाव जितका दयाळू आहे तितकाच त्याची कृती आश्चर्यकारक आहे. खरे तर दिवंगत अभिनेते पुनीत राजकुमार यांनी अनेक गोशाळा, अनाथाश्रम आणि 1800 मुलांना मोफत शिक्षण देण्याची जबाबदारी उचलली होती, मात्र अचानक पुनीत राजकुमारने या जगाचा निरोप घेतल्याने या मुलांचे भविष्य अंधारात दिसू लागले. त्यांच्यानंतर विशालनेच या १८०० मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलण्याचे ठरवले.

महेश बाबू (Mahesh Babu)

 

महेश बाबू हा साउथ सिनेमातील सर्वात स्मार्ट अभिनेता म्हणून ओळखला जातो. तो स्वत: जितका हुशार आहे तितकेच त्याचे मनही सुंदर आहे. याचा पुरावा म्हणजे महेश बाबूने आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील दोन गावे दत्तक घेतली आहेत. त्यांनी तेलंगणातील सिद्धपुरम आणि हैदराबादमधील बुरीपलेम ही दोन गावे दत्तक घेतली आहेत. इथली लोकसंख्या अंदाजे २०६९ आणि ३३०६ इतकी आहे.

अल्लू अर्जुन (Allu Arjun)

पुष्पा द राइज १ नंतर, संपूर्ण भारतामध्ये धुमाकूळ घालणारा साउथचा अभिनेता अल्लू अर्जुनची सर्वात खास गोष्ट म्हणजे तो एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच एक चांगला माणूस देखील आहे. त्याच्यातील माणुसकीचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की, स्टार्स त्याच्या वाढदिवसाला पार्टी करताना दिसतात, याउलट अल्लू अर्जुन त्याच्या वाढदिवसाला मानसिक आजारी मुलांसोबत अधिकाधिक वेळ घालवतो आणि या दिवशी रक्तदानही करतो.

पुनीत राजकुमार (Puneeth Rajkumar)

पुनीत राजकुमार आज आपल्यात नसला तरी त्याने आपल्या अभिनयासोबतच आपल्या उदात्त कर्तृत्वाने लोकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे जे कधीही विसरता येणार नाही. पुनीतने जिवंत असताना १८०० गरीब मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती. यासोबतच त्यांनी कोरोनाच्या काळात ५० लाखांची देणगीही दिली. पुनीत राज कुमार यांनी जिवंत असताना उदात्त कामे केली होती, जगाचा निरोप घेऊनही त्यांनी काही लोकांचे जीवन प्रकाशमान केले आहे. खरे तर त्यांनी त्यांच्या हयातीतच डोळे दान केले होते. 

टॅग्स :अल्लू अर्जुनमहेश बाबू