Join us

अलविदा दिलीपसाब, अंत्यदर्शन घेता न आल्याने हिरमोड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2021 7:07 AM

दिलीप कुमार यांच्या घरापासून ५०० मीटर अंतरापर्यंत बॅरिकेट्स लावण्यात आले होते. यामुळे संपूर्ण परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. निमंत्रित व्यक्ती आणि माध्यम प्रतिनिधी वगळता एकाही व्यक्तीला आत जाण्याची परवानगी दिली जात नव्हती. 

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाचे वृत्त समजताच चाहत्यांनी मिळेल त्या वाहनाने त्यांच्या घराच्या दिशेने धाव घेतली. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम दर्शनास मनाई करण्यात आल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला.

बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास दिलीप कुमार यांच्या निधनाचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसारित झाले. त्यानंतर आपल्या लाडक्या अभिनेत्याचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी चाहत्यांनी वांद्रेतील पाली हिल परिसरात तोबा गर्दी केली. या गर्दीवर नियंत्रण मिळवताना पोलिसांचीही दमछाक झाली. दिलीप कुमार यांच्या घरापासून ५०० मीटर अंतरापर्यंत बॅरिकेट्स लावण्यात आले होते. यामुळे संपूर्ण परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. निमंत्रित व्यक्ती आणि माध्यम प्रतिनिधी वगळता एकाही व्यक्तीला आत जाण्याची परवानगी दिली जात नव्हती. 

दिलीप कुमार साहेबांना डोळे भरून पाहण्याची इच्छा होती. सोशल डिस्टन्सिंग राखून एकेकाला सोडता आले असते. परंतु, पोलीस ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मी खूप विनवण्या केल्या पण निराश होऊन घरी परतावे लागले. - समीर शेख, चाहता

लहानपणी दिलीप साहेबांचे सिनेमे पाहून मी त्यांच्यासारखा अभिनय करण्याचा प्रयत्न करायचो. ‘उडे जब जब जुल्फे तेरी’, ‘साला मैं तो साहब बन गया’ अशी त्यांची कित्येक गाणी आजही अजरामर आहेत. असा एव्हरग्रीन अभिनेता पुन्हा होणे नाही.- मेहबूब खान, चाहता

मी दिलीप साहेबांचे सर्व सिनेमे पाहिले आहेत. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पाली हिलकडे धाव घेतली. सकाळी अजिबात गर्दी नसल्याने अंत्यदर्शन घेऊ देतील, अशी अपेक्षा होती. पण पोलिसांनी एकालाही आत सोडले नाही.- मोहम्मद अन्सारी, चाहता 

टॅग्स :दिलीप कुमारबॉलिवूडमुंबईसिनेमा