आत्तापर्यंत अनेक चित्रपटांनी ग्रामीण भाग आणि तेथील शिक्षणपद्धती यावर प्रकाश टाकला आहे. ५ वर्षांवरील मुलींना शाळेत पाठवण्यास आजही नाकारले जाते, हे वास्तव आहे. शहरी आणि ग्रामीण भाग यांच्या शिक्षणप्रणालीत प्रचंड तफावत असल्याचे सातत्याने दिसून येते. या प्रकाराला वाचा फोडण्यासाठी के.के.मकवाना, नितीन चौधरी दिग्दर्शित आणि अनिल गर्ग निर्मित ‘आय अॅम बन्नी’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. अनिल गर्ग हे लहान मुलांच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध आहेत. प्रवास आणि पर्यटन याअंतर्गत त्यांनी भूज येथे भेट दिली. त्यांना तिथे गेल्यावर समजले की, ५ वर्षांवरील मुलींना शिक्षणाची परवानगी देण्यात येत नाही. जर मुलगी शिकण्यास उत्सुक असेल तिला कुटुंबाकडून त्रास होतो. शहरी आणि ग्रामीण भाग यांच्यातील शिक्षणप्रणालीमध्ये बराच फरक आहे, असे त्यांना जाणवले. मग त्यांनी ‘आय अॅम बन्नी’ या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निश्चय केला. सत्य घटनेवर आधारित चित्रपटाची निर्मिती करून पालकांपर्यंत या माध्यमातून संदेश देण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. ग्रामीण भागातील पाच वर्षांवरील मुलींना शिक्षण देण्यात यावे या एकाच विचाराने प्रेरीत हा चित्रपट असून या चित्रपटाचे शूटिंग ४८ दिवसांत पूर्ण झाले आहे. ''आय एम बन्नी'' चित्रपटाचे संगीत आणि ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. यावेळी संगीतकार ललीत पंडित, अमृता फडणवीस, कनिका कपूर, शान, शिबानी कश्यप, आकृती कक्कर आणि वैशाली सामंत उपस्थित होते.
'आय एम बन्नी'मध्ये अमृता फडणवीस यांनी एक गाणंदेखील गायले आहे. यासिनेमाविषयी बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, “मला जेव्हा या चित्रपटातले मूळ समजले, तेव्हाच याचा एक भाग होण्याची इच्छा मला झाली. उद्योगक्षेत्रातल्या अन्य गायकांसोबत यातल्या महिलाप्रधान गाण्यात सहभागी होण्याचा अनुभव माझ्यासाठी खूप खास होता. मुलींच्या शिक्षणाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी ही खूपच उत्कृष्ट संकल्पना आहे,’’ हा चित्रपट 18 जानेवारी 2019 रोजी प्रदर्शित होत आहे.