Join us

अमाल मलिकने काढली हिंदी अवॉर्ड्सची औकात!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2017 1:39 PM

तरुण संगीतकार अमाल मलिकने सध्या सुरू असलेल्या चित्रपट पुरस्कार सोहळ्यांची चांगलीच खरडपट्टी केली आहे. हिंदी चित्रपट अवॉर्ड्सबद्दल नेहमीच तक्रार ...

तरुण संगीतकार अमाल मलिकने सध्या सुरू असलेल्या चित्रपट पुरस्कार सोहळ्यांची चांगलीच खरडपट्टी केली आहे. हिंदी चित्रपट अवॉर्ड्सबद्दल नेहमीच तक्रार असते की, येथे केवळ लोकप्रिय आणि स्टारपुत्रांनाच प्रधान्य दिले जाते. अशा पुरस्कारांना विरोध करणाऱ्यांमध्ये आता अमाल मलिकचेही नाव जोडले गेले.फेसबुकवर एका दीर्घ पोस्टमध्ये त्याने पुरस्कार आयोजकांवर कडाडून टीका केली आहे. त्याने लिहिले की, ‘कोणीच न पाहिलेल्या अभिनेत्याला तुम्ही सर्वोत्तम पदार्पणाचा पुरस्कार देता. कारण का तर तो एखाद्या बड्या कलाकाराचा मुलगा आहे म्हणून? अहो न्यू कमरचा खरा मानकरी तर ‘उडता पंजाब’साठी दिलजीत दोसांझ आहे. ‘सरबजीत’सारख्या सिनेमात रणदीप हुडाने भूमिकेसाठी आकाश-पाताळ एक केले आणि नामांकित कोणाला केले तर फक्त ऐश्वर्याला!’त्याचा राग एवढ्यावरच थांबला नाही. तो स्वत: दोन-दोन चित्रपटांसाठी नामांकित आहे. तरीदेखील त्याने स्वत:च्या नामांकनावरसुद्धा टीका केली आहे. तो लिहितो, ‘कपूर अँड सन्स’साठी मला नॉमिनेशन मिळणे मी समजू शकतो पण ‘बागी’सारख्या सुमार संगीतासाठी नामांकित करणे म्हणजे अतिच झाले. ‘एम. एस. धोनी’सारखा पर्याय असताना तुम्ही ‘बागी’ला कसे काय नॉमिनेट करू शकता? ‘ऐ दिल है मुश्किल’ हे प्रीतमच आतापर्यंतचे सर्वाेत्तम संगीत आहे हे मी मानतो पण ‘दंगल’सुद्धा काही कमी नाही. माझ्या भावालासुद्धा सिंगरचे नॉमिनेशन नाही.’अक्षय कुमारला डावलण्यात आल्यामुळे चोहीबाजूंनी या पुरस्कार सोहळ्यांवर टीका होत आहे. अनेक कलाकार, चित्रपट असे आहेत जे खऱ्या अर्थाने पुरस्कारांचे मानकरी आहेत परंतु त्यांना जाणूनबुजून डावलण्यात आले आहे. पण अमाल मलिकच्या अशा थेट प्रतिक्रियेमुळे इंडस्ट्रीत काय परिणाम होतील हे येणाऱ्या काळात समजेलच.