सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी रोज नवे खुलासे होत असताना आता सुशांतचा मृतदेह नेण्यासाठी बोलवल्या गेलेल्या रूग्णवाहिकेच्या चालकाने एक धक्कादायक खुलासा केला आहे. काही दिवसांपूर्वी शहनवाज अब्दुल करीम नावाच्या या चालकाने त्याला इंटरनॅशनल नंबरवरून धमकीचे फोन येत असल्याचा दावा केला होता. आता त्याने वेगळीच माहिती दिली आहे. होय, सुशांतच्या मृतदेहाचे फोटो मुंबई पोलिसांनीच फेसबुकवर अपलोड केले होते, असे त्याने म्हटलेय.
‘टाइम्स नाऊ’या चॅनलला दिलेल्या हिडन कॅमेरा इंटरव्ह्यूमध्ये शहनवाजने त्यादिवशीचा सगळा वृत्तांत सांगितला आहे. ‘मी तिथे गेलो तेव्हा सुशांतचा मृतदेह लटकलेला नव्हता. तो खाली उतरवण्यात आला होता आणि त्यावर एक पांढरी चादर झाकलेली होती,’ असे त्याने सांगितले. शिवाय सुशांतच्या मृतदेहाचे फोटो मुंबई पोलिसांनीच सोशल माध्यमावर अपलोड केले होते, असा दावाही त्याने केला आहे. आधी पोलिसांनी सुशांतचा मृतदेह नानावटी रूग्णालयात न्यायचा असल्याचे सांगितले. मात्र नंतर तो कूपर रूग्णालयात न्यायचा असल्याचे म्हटले, अशी माहितीही त्याने दिली.
सुशांतचा मृतदेह फासावरून खाली उतवण्यात आल्यानंतर लगेच त्याच्या मृतदेहाचे फोटो काढण्यात आले होते. सुशांतच्या आत्महत्येच्या बातमीनंतर काहीच क्षणात हे फोटो व्हायरल झाले होते. मात्र यानंतर 14 जूनला म्हणजे सुशांतने आत्महत्या केली त्याच दिवशी रात्री मुंबई पोलिसांनी या फोटोंबद्दल एक ट्वीट केले होते. हे फोटो मोबाईल फॉरवर्ड करणा-याविरूद्ध कठोर कारवाई केली जाईल, अशी तंबी मुंबई पोलिसांनी या ट्वीटमध्ये दिली होती. बिहार पोलिस आता याप्रकरणाचाही तपास करत आहेत. सुशांतच्या या फोटोंमध्येही काही ‘रहस्य’ दडलेले आहे का? या दिशेने बिहार पोलिसांचा तपास सुरु आहे.