Join us

रेडियोचे जादूगार अमीन सयानींनी जेव्हा बिग बींना केलं होतं रिजेक्ट, वाचा काय आहे तो किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 2:06 PM

अमीन सयानी म्हणाले होते, "बरं झालं रिजेक्ट केलं नाहीतर मी रस्त्यावर आलो असतो."

आवाजाच्या दुनियेचे जादूगार,आपल्या भारदस्त आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे आकाशवाणीवरील वृत्तनिवेदक अमीन सयानी यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. आज मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालं. अमीन सयानी आणि अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांचा असा एक किस्सा जो खूप कमी लोकांना माहित असेल. त्यांनी बिग बींना रिजेक्ट केलं होतं असा तो किस्सा आहे. नक्की काय झालं होतं जाणून घ्या.

अमीन सयानी यांना रेडियोमुळे लोकप्रियता मिळाली होती. तेव्हा त्यांचा आकाशवाणीवर दबदबा होता. अशातच महानायक अमिताभ बच्चन वयाच्या ४०-४५ व्या वर्षी मुंबईच्या रेडियो स्टुडिओमध्ये ऑडिशनसाठी गेले होते. बिग बी अपॉइंटमेंट न घेताच तिथे पोहोचले होते. या कारणामुळे अमीन सयानी यांनी अमिताभ बच्चन यांना भेट नाकारली. तसंच त्यांचा आवाज न ऐकताच रिजेक्ट केलं. नंतर जेव्हा अमीत सयानी यांनी अमिताभ बच्चन यांचा 'आनंद' सिनेमा पाहिला तेव्हा त्यांना बिग बींच्या भारदस्त आवाजाचा अंदाज आला आणि आपल्या चुकीची जाणीव झाली. 

अमीन सयानी नंतर एका मुलाखतीत म्हणाले होते की, "आनंद सिनेमा पाहिल्यानंतर मला त्याचा आवाज आवडला. मला त्याला रिजेक्ट केल्याचं आजही दु:ख होतं. पण दुसरीकडे मी विचार करतो की बरंच झालं. जर तो रेडियोत आला असता तर कदाचित मी रस्त्यावर आलो असतो. सोबतच भारतीय सिनेमा एवढ्या दमदार अभिनेत्याला मुकला असता."

अमीन सयानी यांचा जन्म २१ डिसेबर १९३२ रोजी मुंबईत झाला होता. त्यांनी भारतीय रेडिओच्या जगतामध्ये खूप प्रसिद्धी मिळवली होती. आकाशवाणीच्या उत्कर्षाच्या काळात अमीन सयानी यांच्या आवाजाच्या जादूने श्रोत्यांवर भूरळ घातली होती. अमीन सयानी यांनी रेडिओ निवेदक म्हणून कारकिर्दीची सुरुवात आकाशवाणी, मुंबईमधून केली होती. इथे त्यांनी १० वर्षांपर्यंत इंग्लिश कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता अमीन सयानी यांचं निवेदन असलेला बिनाका गीतमाला हा कार्यंक्रम खूप लोकप्रिय ठरला होता.  

टॅग्स :अमिताभ बच्चनमाध्यमेमुंबईबॉलिवूड