महाराष्ट्र नवनिर्माण सेने(MNS)चे नेते अमेय खोपकर (Amey Khopkar) सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी कलाकारांवर निशाणा साधत असतात. दरम्यान आता त्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांना टार्गेट केले आहे. त्यांनी पाकिस्तानी कलाकारांबाबत एक ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
अमेय खोपकर यांनी ट्विट केले की, भारतात अशांतता माजवण्यासाठी सतत कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानची नियत पाक नाही हे ढळढळीत सत्य आहे. पाकिस्तानने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात निरपराध भारतीयांचे बळी गेले. काहीजण हे विसरले असले तरी आम्ही विसरुच शकत नाही. म्हणूनच फक्त खेळाडूच नाही तर पाकिस्तानी कलाकारांना आमचा विरोध कायम आहे याची आठवण करुन देतोय. पाकिस्तानी कलाकार भारतीय सिनेमांमध्ये किंवा सिरीजमध्ये काम करणार असतील तर त्यांच्या तंगड्या तोडून त्यांच्याच हातात देऊ. त्याची जबाबदारी संपूर्णपणे संबंधित निर्मात्यांची राहील.
अमेय खोपकर बऱ्याचदा ट्विटरच्या माध्यमातून पाकिस्तानी कलाकारांवर निशाणा साधत असतात. याआधी त्यांनी महिनाभरापूर्वी ट्विट केले होते. त्यात म्हटले होते की, 'बॉलिवूडमधील काही निर्मात्यांना पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आलाय, असं कानावर येतंय. म्हणूनच पुन्हा एकदा आम्ही स्पष्ट शब्दात इशारा देतोय की फक्त मुंबईच काय, हिंदुस्थानातील कोणत्याही भाषेतल्या कलाकृतीत पाकिस्तानी कलाकार दिसला तर त्याचे गंभीर परिणाम संबंधित निर्मात्यांना भोगावे लागतील.'
'द लेजेंड ऑफ मौला जट्ट'ला केला होता विरोध'द लेजेंड ऑफ मौला जट्ट' या पाकिस्तानी चित्रपटाचा विरोध देखील खोपकर यांनी केला होता. 'नाही म्हणजे नाहीच. फवाद खानचे जे कुणी देशद्रोही फॅन्स असतील त्यांनी खुशाल पाकिस्तानमध्ये जाऊन सिनेमा बघावा.' असं ट्वीट अमेय खोपकर यांनी केले होते.