शाहरूख खान (Shah Rukh Khan ) सध्या त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नव्या वर्षात 25 जानेवारीला हा सिनेमा रिलीज होतोय. पण रिलीजआधीच हा चित्रपट वादात अडकला आहे. ‘पठाण’चं ‘बेरशम रंग’ हे गाणं रिलीज झालं आणि या गाण्यावरून वातावरण तापलं. हे गाणं अश्लिलता वाढवणारं असल्याचा आरोप झाला. हिंदू संघटनांनी ‘पठाण’वर हिंदूच्या भावना दुखावल्याचा आरोप केला. हा सगळा गदारोळ सुरू असतानाच शाहरूखचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
होय, तू हिंदू असतास तर?असा प्रश्न एका जुन्या मुलाखतीत शाहरूखला विचारण्यात आला होता. या प्रश्नावर किंगखानने सुंदर उत्तर दिलं होतं. त्याचीच क्लिप आता शेअर होतेय.
शाहरुख आणि करण जोहर एका कार्यक्रमात सहभागी झाले होते तेव्हा शाहरुखला एका व्यक्तीने हा प्रश्न विचारला होता. ‘जर तू हिंदू असता किंवा तुझं नाव वेगळं असतं, समजा तुझं नाव शेखर राधा कृष्ण (एसआरके) असतं, तर... ? तर तुला लोकांनी धर्मावरून बोलणं थांबवलं असतं का?,’ असा प्रश्न शाहरूखला विचारला गेला होता. यावर शाहरूखच्या उत्तरानं सगळ्यांची मनं जिंकली होती.
काय म्हणाला होता शाहरूख...जर मी हिंदू असतो, माझं नाव शेखर राधा कृष्ण (एसआरके) तर ते सुद्धा छानच वाटलं असतं. माझ्यामते मी हिंदू असतो तरीही काहीच फरक पडला नसता. मला वाटतं कलाकार हा नेहमीच सामाजिक आणि धार्मिक बंधनांच्या पलीकडचा विचार करतो. त्यामुळे मला तुम्ही कोणत्याही नावाने हाक मारली असती तरी मी तितकाच गोड आणि प्रेमळ असतो..., शाहरुखचं हे उत्तर ऐकून तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्याचं कौतुक केलं होतं.शाहरूखच्या ‘पठाण’ या सिनेमाबद्दल सांगायचं तर यात शाहरूख व दीपिका लीड रोलमध्ये आहेत. जॉन अब्राहम या सिनेमात निगेटीव्ह रोलमध्ये दिसणार आहे.