मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमीर खान सध्या तुफान आलंया म्हणत महाराष्ट्र पाणीदार करण्याच्या मोहिमेवर निघाला आहे. महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर साताऱ्यातील एका गावातून आमीरने महाश्रमदानाला सुरूवात केली आहे. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी आमीरसह त्याची पत्नी किरण रावसुद्धा खांद्याला खांदा भिडवत काम करत आहे. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राज्याच्या विविध भागात वॉटर कप स्पर्धेला सुरूवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आमीर आणि त्याची पत्नी किरण राव साताऱ्यातील गावात श्रमदान करत घाम गाळत असल्याचे साऱ्या महाराष्ट्राने पाहिलं. याच मोहिमेसाठी फिरत असताना आमीर आणि किरण जवळाअर्जुन गावात पोहोचले.
राज्यात सूर्यनारायण चांगलाच तापलाय. पारा ४५ अंशांवर गेलाय. त्यामुळे अशा उष्ण वातावरणात घसा कोरडा पडणारच. त्यामुळेच की आमीर आणि किरण या गावातल्या ढाब्यावर पोहोचले. सुरूवातीला दोघांनी ऊसाचा गारेगार रस घेत घशाची कोरड दूर केली. हे दाम्पत्य एवढ्यावरच थांबलं नाही. त्यांनी या ढाब्यावरील स्पेशल चिवडा भेळ ऑर्डर करत त्यावरही मनमुराद ताव मारला. बॉलीवुडचा सुपरस्टार पत्नीसोबत गावात येतो आणि स्टारडम विसरत इथल्या ढाब्यावर रस आणि चिवडाभेळ खातो ही बाब इथल्या ग्रामस्थांसाठी तितकीच सुखद धक्का होती. या ढाब्यावरील एक फोटो आमीरने सोशल मीडियावर शेअर केला आहे.