'गदर 2' (Gadar 2) सिनेमा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालतोय. काहीच दिवसात चित्रपटाचं कलेक्शन ६०० कोटींपर्यंत पोहोचेल असं चित्र आहे. दरम्यान सिनेमाच्या तिसऱ्या भागाचीही चर्चा सुरु झाली आहे. मात्र 'गदर 2'मध्ये अमिषा पटेलचा (Amisha Patel) रोल तसा छोटा वाटला. 22 वर्षांपूर्वी आलेल्या 'गदर एक प्रेम कथा' सिनेमाप्रमाणे अमिषाला 'गदर 2'मध्ये जास्त काम मिळालं नाही. यावर अमिषा पटेलने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.
'गदर एक प्रेम कथा' सिनेमात तारासिंग आणि सकीनाची जोडी प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली होती. त्यांची प्रेमकहाणी सिनेरसिकांना खूप भावली. 'गदर 2'मध्ये मात्र त्यांच्या प्रेमकहाणीची जादू फिकी पडली. प्रेक्षक थिएटरमध्ये तारासिंग आणि सकीनाची जोडी बघायला येतात. तेच त्यांना बघता आलं नाही तर ते नाराज होणं साहजिक आहे असं अमिषा पटेल म्हणाली.
'गदर 2'मध्ये स्क्रीनटाईम कमी मिळाल्याने अमिषा पटेल म्हणाली, 'चाहत्यांची इच्छा पूर्ण झाली नाही. त्यांना तारा आणि सकीनाला बघायचं होतं. यावेळी कलाकार म्हणून नि:स्वार्थ भावनेने काम करावं लागलं. यामुळे तारा आणि सकीनाला मागे राहावं लागलं. आम्हाला वेगळ्या प्रकारची फिल्म बनवायची होती. सकीना परत पाकिस्तानात जाऊन पकडली जाणार नाही. ना ही तारासिंग तिला पाकिस्तानात घेऊन जाणार होता. ती अशरफ अलीची मुलगी आहे हे माहित असून सुद्धा. म्हणून सिनेमाचा पहिला हाफ माझा होता आणि दुसरा हाफ सनीचा होता. वरिष्ठ कलाकार म्हणून आम्हाला यात अडचण नाही असं आम्ही म्हणालो.'
अमिषा पुढे म्हणाली,'गदर ३ ची स्टोरी आल्यावर मी आधीच स्पष्ट करेन. गदर ३ मध्ये जर तारा आणि सकीनाचे सीन्स कमी असतील तर मी सिनेमाला नकार देईन. मी करणारच नाही. मी चाहत्यांना निराश करु शकत नाही. मला माहितीये त्यांना यावेळी काहीतरी कमी असल्यासारखं वाटलं असेल. म्हणूनच हे आमचं कर्तव्य आहे त्यांना जे पाहायचं आहे ते आम्ही दाखवू. शेवटी ते लोक तारासिंग आणि सकीनाला बघायला थिएटरमध्ये जातात. त्यांच्याशी प्रेक्षक जोडलेले आहेत. तुम्ही केट विन्सलेट आणि लिओनार्डो डी कॅप्रिओ शिवाय टायटॅनिक बनवू शकत नाही. म्हणूनच परदेशातील लोकांनी दुसरा पार्ट पहिल्या पार्टसारखा नाही पाहिला.'
'गदर 3' मेकिंग वरुन अजून काहीच कन्फर्म नाही. अनिल शर्मा सध्या इतर प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहेत. सनी देओलही जुन्या कमिटमेंट्स पूर्ण करत आहे. मात्र येत्या काही वर्षात 'गदर 3' नक्की बनेल यात शंका नाही.