बिग बी आणि बॉलिवूड हे अत्यंत अतुट असं नातं. चित्रपट, जाहीराती आणि वेगवेगळया प्रोजेक्ट्समध्ये बिग बी त्यांचा अनोखा अंदाज सादर करताना दिसतात. त्यांना बॉलिवूडसोबतच सामाजिक बाबींकडेही ते विशेषत्वाने लक्ष देतात. ते कायमच समाजकार्यामध्ये योगदान देत असतात. त्यासोबतच सामाजिक परिस्थितीचं भान राखत स्वत:ची जबाबदारी आणि कर्तव्यही पार पाडत असतात. अलीकडेच बिग बींनी ७० कोटी रुपयांचा कर भरला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बिग बी यंदाच्या वर्षामध्ये सर्वाधिक कर भरणारे सेलिब्रेटी ठरले आहेत.
सामाजिक कर्तव्याची जाण ठेऊन कर भरणाऱ्या बिग बींनी काही दिवसांपूर्वीच मुजफ्फरपूरमधील २०८४ शेतकऱ्यांचे कर्ज फेडले होते. त्याआधी १४ फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना १० लाख रूपयांची मदत केली होती. त्यामुळे सध्या सर्वच स्तरांमधून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, बिग बी या वयातही हरहुनरीने अभिनय करत असून त्यांचा बदला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. ‘बदला’मधील बिग बींच्या भूमिकेलाही चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. तसेच याच वर्षात ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटातून बिग बी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमिताभ बच्चन यांच्याव्यतिरिक्त चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, नागार्जुन प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.