अमिताभ बच्चन आणि आयुष्यमान खुराणा स्टारर ‘गुलाबो सिताबो’ हा सिनेमा याच महिन्यात 17 तारखेला प्रेक्षकांच्या भेटीस येणार होता. पण कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अख्खे शेड्यूल बिघडले. होय, लॉकडाऊनमुळे चित्रपटगृह बंद असल्याने प्रदर्शनासाठी सज्ज असूनही ‘गुलाबो सिताबो’ रिलीज होऊ शकला नाही.तूर्तास तरी स्थिती कधी सामान्य होईल, चित्रपट कधी रिलीज होतील, हे सांगणे कठीण आहे. अशात ‘गुलाबो सिताबो’ हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याची चर्चा सुरु झाली आहे. खुद्द ‘गुलाबो सिताबो’चे दिग्दर्शक शूजित सरकार यांनी याबद्दल संकेत दिलेत.
मुंबई मिररशी बोलताना ते म्हणाले, ‘ दिग्दर्शक या नात्याने खरे तर माझा चित्रपट चित्रपटगृहांमध्येच रिलीज व्हावा, अशी माझी इच्छा आहे. पण अशी काही स्थिती ओढवले, याची कुणीच कल्पना केली नव्हती. त्यामुळे गरज भासल्यास मी डिजीटल रिलीजसाठी तयार आहे. पण आम्ही 3 मे नंतरच याबद्दलचा निर्णय घेऊ.म्हणजेच काय तर, ‘गुलाबो सिताबो’ चित्रपटगृहांत रिलीज होईल की डिजीटल प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल, हे 3 मेला लॉकडाऊन संपल्यानंतरच्या सरकारच्या निर्णयावरच अवलंबून असणार आहे.
‘गुलाबो सिताबो’ या सिनेमात आयुषमान व अमिताभ ही जोडी पहिल्यांदा एकत्र दिसणार आहे. या जोडीला पडद्यावर एकत्र पाहण्यास प्रेक्षक कमालीचे उत्सुक होते. ‘गुलाबो सिताबो’मधील अमिताभ यांचा फर्स्ट लूक पाहूनही प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.या सिनेमाची कथा जुही चतुवेर्दीने लिहिली आहे तर रॉनी लहरी आणि शीला कुमार यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे.