वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं. फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाल्याने कोट्यवधी भारतीयंचं हृदय तुटलं. त्यामुळे पुन्हा एकदा भारताचं विश्वविजेता होण्याचं स्वप्न भंगलं. वर्ल्डकपचा अंतिम सामना हरल्यानंतर भारतीय खेळाडू भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. भारतीय खेळाडूंना मैदानातच अश्रू अनावर झाले. या सामन्यानंतर क्रिकेटप्रेमींप्रमाणेच सेलिब्रिटीही सोशल मीडियावर पोस्ट करत टीम इंडियाला पाठिंबा देत आहेत. आता बिग बी अमिताभ बच्चन यांनीही ट्वीट केलं आहे.
भारताचा पराभव झाल्यानंतर बिग बींनी ट्वीट करत टीम इंडियाला धीर दिला आहे. "टीम इंडिया...काल रात्रीचा पराभव हे तुमच्या कौशल्य, कार्यक्षमता आणि योग्यतेचं कोणत्याही प्रकारचं प्रतिबिंब नाही. आम्हाला तुमचा गर्व आहे. चांगल्या गोष्टी घडतील," असं ट्वीट केलं आहे.
याबरोबरच त्यांनी आणखी एक ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यांनी "तुमची कार्यक्षमता, प्रतिभा, योग्यता यापेक्षा खूप जास्त आहे. तुम्ही याआधी खेळलेल्या १० सामन्यांत ते दिसून आलं. तुम्हाला पाहून इतर टीमला भीती वाटते. वर्ल्डकपमध्ये आधीच्या विजेत्यांचाही तु्म्ही पराभव केला...तुम्ही बेस्ट आहात..आणि राहाल," असं म्हटलं आहे. पण, अमिताभ बच्चन यांच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडत "तुम्ही मॅच का बघितली?" असा सवाल त्यांना केला आहे.
एकाने कमेंट करत "तुम्ही मॅच हा पाहिली? ते आधी सांगा" असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "तुम्ही तर मॅच पाहिली नाही ना?" अशी कमेंट केली आहे.
"तुम्ही टीव्ही बंद केली असती तर हा दिवस पाहायला लागला नसता," असंही म्हटलं आहे. "काल तुम्ही मॅच पाहिली ना? खोटं बोलू नका", अशी कमेंटही एका नेटकऱ्याने केली आहे.
एकाने अमिताभ बच्चन यांच्या आधीच्या ट्वीटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. "तुम्ही टीव्ही बघत होतात. एक दिवस नसती बघितली तर काय झालं असतं? सिलसिला चित्रपट बघितला असता एक दिवस रिपीट मोडवर..." असं नेटकऱ्याने म्हटलं आहे.
भारताने न्यूझीलंड विरुद्ध सेमी फायनलमध्ये विजय मिळवल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी ट्वीट केलं होतं. "मी जेव्हा मॅच बघत नाही तेव्हा आपण जिंकतो", असं बिग बी म्हणाले होते. त्यांच्या या ट्वीटनंतर क्रिकेटप्रेमींनी त्यांना मॅच न बघण्याचा सल्ला दिला होता. आता या ट्वीटवरही नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.