अमिताभ बच्चन आणि जया बच्चन या दाम्पत्याच्या नावे १० अब्ज रूपयांची संपत्ती!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2018 9:12 AM
बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी अभिनेत्री तथा खासदार जया बच्चन १० अब्ज रूपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. राज्यसभा ...
बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी अभिनेत्री तथा खासदार जया बच्चन १० अब्ज रूपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. राज्यसभा खासदार असलेल्या जया बच्चन यांनी नुकतेच निवडणूक आयोगाकडे दिलेल्या शपथपत्रात याबाबतचा खुलासा केला. जया बच्चन यांनी शुक्रवारी (दि.९) समाजवादी पक्षाकडून राज्यसभेवर पुन्हा निवडणून जाण्यासाठी अर्ज दाखल केला. यावेळी सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, जया आणि अमिताभ यांच्याकडे जवळपास १०.०१ अब्ज रूपयांची संपत्ती आहे. जया यांच्याकडे १.९८ अब्ज रूपये इतकी संपती तर, पती अमिताभ बच्चन यांच्यानावे सुमारे ८.०३ अब्ज रूपयाची मालमत्ता आहे. अमिताम आणि जया या दोघांचेही जगातील विविध देशांमधील बॅँकेत खाते आहेत. शपथ पत्रात दिलेल्या माहितीनुसार, जया आणि अमिताभ यांचे लंडन, दुबई आणि पॅरिसमध्ये बॅँक खाते आहेत. देश-विदेशात मिळून त्यांचे जवळपास १९ बॅँक खाते आहेत. यातील चार खाते जया बच्चन यांच्या नावे असून, त्यामध्ये ६.८४ कोटी २९ लाख रूपये जमा आहेत. तर अमिताभ बच्चन यांचे १५ बॅँक खाते असून, त्यामध्ये ४७.४७ कोटी रूपयांपेक्षा अधिक फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे जमा केले आहेत. बिग बी यांचा पैसा आणि एफडी दिल्ली, मुंबई व्यतिरिक्त पॅरिस आणि लंडन येथील बॅँक आॅफ इंडियाची शाखा तसेच बीएनपी फ्रान्समध्ये जमा आहेत. जया बच्चन यांच्या शपथ पत्रात बच्चन परिवाराकडून घेतलेल्या कर्जाचाही उल्लेख करण्यात आला आहे. जया बच्चन यांना जवळपास ८७ कोटी ३४ लाख रूपये देणे आहेत. तर अमिताभ यांच्यावर १८ कोटी २८ लाख रूपये कर्ज आहे. त्याचबरोबर या शपथपत्रावरून हेदेखील स्पष्ट होते की, गेल्या सहा वर्षात बच्चन परिवाराची संपत्ती दुप्पट झाली आहे. जया बच्चन यांनी २०१२ रोजी राज्यसभेसाठी नामांकन दाखल करताना आपली आणि पती अमिताभ यांची संपत्ती जवळपास ५ अब्ज रूपये इतकी दाखविली होती. आता त्यामध्ये दुप्पटीने वाढ झाली असून, हा आकडा १० अब्ज रूपयांपेक्षा जास्त झाला आहे. या आकड्यांवरून हेदेखील स्पष्ट होते की, बच्चन परिवाराकडे २०१२ मध्ये १५२ कोटी रूपयांची अचल संपत्ती होती. मात्र आता ती ४६० कोटी रूपये झाली आहे. २०१२ मध्ये अमिताभ आणि जया यांच्याकडे ३४३ कोटी रूपयांची चल संपत्ती होती, २०१८ मध्ये ५४० कोटी रूपये झाली आहे. जया बच्चन २०१२ मध्ये समाजवादी पक्षाकडून राज्यसभेवर निवडून गेल्या होत्या. पक्षाने यावेळेस देखील त्यांनाच उमेदवारी दिली आहे. उत्तर प्रदेशात राज्यसभेच्या दहा जागांसाठी २३ मार्च रोजी मतदान होणार आहे.