बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) ट्विटरवर प्रचंड अॅक्टिव्ह असतात. नुकतंच त्यांच्या अकाऊंटवरुन ब्लू टिक काढून घेतल्याने ते वैतागले होते. आपल्या खास अंदाजात ट्वीट करत त्यांनी ट्विटरसमोर ब्लू टिक परत द्या म्हणत हात जोडले. आता त्यांचं ब्लू टिक परत आलं आहे मात्र त्यासाठी त्यांना पैसे भरावे लागले. आता एक वेगळीच माहिती उघड झाल्याने ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी बिग बींची फसवणूक केल्याचंच उघड झालंय.
नेमकं काय घडलं?
एलॉन मस्क यांनी २० एप्रिलपासून एक नियम सुरु केला. ब्लू टिक कोणालाही मोफत मिळणार नाही तर त्यासाठी दरमहा 650 रुपये मोजावे लागतील. मात्र आता असा नियम समोर आला की ज्यांचे १ मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत त्यांना पैसे भरावे लागणार नाहीत. हे समजल्यावर अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करत जाब विचारला आहे.
ते लिहितात, 'ए ट्विटर मावशी, काकी, ताई, आत्या...झोळी भरुन नावं आहेत तुझे! पैसे तर घेतले माझ्याकडून अन् आता सांगते की 1 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स असतील तर ब्लू टिक मोफत मिळेल. माझे तर 48.4 मिलियन फॉलोअर्स आहेत, मग ?? पैसे मिळाले, खेळ संपला??'
अमिताभ बच्चन यांच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. 'आता तुम्हाला पैसे परत मिळणार नाहीत, मस्क यांनी तुम्हाला फसवलं' अशा कमेंट्स युझर्सने केल्या आहेत.