बॉलिवूडकरांचं क्रिकेट प्रेम काही केल्या लपत नाही. अनेक सेलिब्रिटीही क्रिकेटचे चाहते आहेत. क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी अनेकदा स्टेडियममध्ये सेलिब्रिटी टीमला चिअर करताना दिसतात. काही सेलिब्रिटी क्रिकेट टीमचे मालकही आहेत. शाहरुख खान, प्रीती झिंटानंतर अक्षय कुमारनेही क्रिकेट टीम विकत घेतली होती. आता अक्षय कुमार पाठोपाठ बिग बी अमिताभ बच्चनही क्रिकेट टीमचे मालक झाले आहेत.
अमिताभ यांनी इंडियन स्ट्रीट प्रिमिअर लीग म्हणजेच ISPLमधील मुंबईची टीम विकत घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत बिग बींनी ही माहिती त्यांच्या चाहत्यांना दिली आहेत. त्यामुळे आता अमिताभ बच्चनही क्रिकेट टीमचे मालक झाले आहेत. मुंबई महाराष्ट्र टीमचा मालक झाल्यानंतर बिग बींचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. "मुंबई टीमचा मालक होणं ही माझ्यासाठी प्रतिष्ठेची बाब आहे. इस पहल की चहल, जिंदाबाद... जय हो! जय हिन्द", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, अक्षय कुमारने ISPLमधील श्रीनगर ही टीम खरेदी केली आहे. २ ते ९ मार्च २०२४ दरम्यान इंडियन स्ट्रीट प्रिमिअर लीग (ISPL)मधील सामने खेळवले जाणार आहेत. या लीगसाठी क्रिकेट प्रेमींमध्ये उत्सुकता आहे.