बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस. बिग बी म्हणून ओळखल्या जाणा-या अमिताभ यांची लोकप्रियता आजही तशीच कायम आहे. पाच दशकांहून अधिक काळ, 200 हून अधिक सिनेमे आणि अपार लोकप्रियता मिळवणा-या बिग बींबद्दलचे अनेक किस्से आहेत. आज बिग बींच्या वाढदिवशी असाच एक किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.तर किस्सा आहे ‘आनंद’ या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीचा.
अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांचा ‘आनंद’ हा क्लासिक सिनेमा प्रदर्शित होऊन चार दशकांपेक्षा अधिक काळ झाला. चित्रपटाची पटकथा असो वा कलाकारांचा अभिनय. या चित्रपटाने प्रत्येकबाबतीत इतिहास रचना. ऋषीकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामुळे अमिताभ बच्चन एका रात्रीत सुपरस्टार बनले. या चित्रपटाशी संबंधित एक इंटरेस्टिंग किस्सा कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल. अलीकडे स्वत: अमिताभ यांनी हा किस्सा सांगितला होता.‘आनंद’ हा अमिताभ यांच्या सुरुवातीच्या काळातील सिनेमा होता. साहजिकच अमिताभ यांना फार कुणीही ओळखत नव्हते.
तर ‘आनंद’ रिलीज झाला त्याच दिवशीची ही गोष्ट. ज्यादिवशी हा सिनेमा रिलीज झाला, त्यादिवशी सकाळी अमिताभ आपल्या कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी एका पेट्रोलपंपवर गेले होते. त्यावेळी कुणीही त्यांना ओळखले नाही. कारमध्ये पेट्रोल भरायला आलेला हा बॉलिवूड स्टार आहे, हे लोकांच्या गावीही नव्हते. संध्याकाळी अमिताभ त्याच पेट्रोलपंपवर पुन्हा गेले आणि काय आश्चर्य एवढा मोठा स्टार आपल्या पेट्रोलपंपवर पेट्रोल भरायला आलेला पाहून लोकांनी एकच गर्दी केली. ‘आनंद’ने ही कमाल केली होती. ‘आनंद’ रिलीज होताच अमिताभ बच्चन स्टार झाले होते.
‘आनंद’ हा ख-या अर्थाने अमिताभ यांचा पहिला हिट सिनेमा होता. यानंतर अमिताभ यांनी अनेक सुपरहिट सिनेम दिले. पुढे तर त्यांनी इतिहास रचला. महानायक म्हणून ते ओळखले जाऊ लागले. ‘आनंद’या सिनेमात राजेश खन्ना यांनी एका कॅन्सर रूग्णाची भूमिका साकारली होती. चित्रपटाची गाणीही तुफान लोकप्रिय झाली होती.
11 ऑक्टोबर 1942 मध्ये उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमध्ये बिग बी यांचा जन्म झाला. जन्मापूर्वी त्यांचे नाव इन्कलाब श्रीवास्तव असे होते. परंतु त्यांचे हे नाव बदलून अमिताभ असे ठेवण्यात आले. अमिताभ म्हणजे असा प्रकाश जो कधीही कमी होत नाही. त्यामुळे बिग बींचं अमिताभ हे नामकरण करण्यात आलं. अमिताभ बच्चन यांच्या आईमुळे त्यांची पावलं रंगभूमीकडे वळली आणि याच जोरावर ते मुंबईमध्ये आले. या कालावधीमध्ये त्यांना वडीलांकडून साहित्याचाही मोठा वारसा मिळाला होता.
मुझसे ना हो पाएगा... म्हणत अमिताभ बच्चन ढसाढसा रडले; पण मेहमूद यांच्या हृदयाला फुटला नाही पाझर
अमिताभ यांनी मुंबई गाठल्यानंतर भुवन शॉ, सात हिंदुस्तानी हे त्यांच्या कारकीर्दीतले अगदी सुरुवातीचे चित्रपट होते. त्यानंतर जंजीर, कुली, लावरिस, त्रिशूल, खून-पसीना, कालिया, अग्नीपथ, काला पथ्थर, डॉन या चित्रपटांमध्ये ते झळकले. विशेष म्हणजे हे सारेच चित्रपट त्याकाळी प्रचंड हिट ठरले. या सगळ्या चित्रपटांमधून वेळोवेळी बदलती समाजव्यवस्था, राजकारण, समाजकारण, आणि वाढती गुन्हेगारी याचे चित्रण झाले. त्यामुळे अमिताभ हिंदी चित्रपटसृष्टीतील एका नव्या प्रवाहाला निमित्त ठरले. चुपके-चुपके, नमक-हलाल, मिलीसारखे वेगळे चित्रपटही त्यांनी केले. तर सिलसिला, कभी-कभी, मुकद्दर का सिकंदर अशा चित्रपटांमधून प्रेमाची नवी परिभाषा उलगडली.