बॉलिवूडचा शहेनशाह म्हणजे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan )आणि संघर्षाचं दुसरं नाव म्हणजेही अमिताभ बच्चन. होय, संघर्ष भल्याभल्यांना चुकला नाही. अगदी महानायक अमिताभ बच्चन यांच्या वाट्यालाही मोठा संघर्ष आला. आज ऐश्वर्य अमिताभ यांच्या पायाशी लोळण घालतं. पण एकेकाळी हेच अमिताभ दिवाळखोरीच्या मार्गावर पोहोचले होते. अगदी लोकांना काम मागण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. (Amitabh Bachchan Birthday)वय 57 वर्षाचं. या वयात निवृत्तीचे विचार डोक्यात घोळू लागतात. पण याच वयात अमिताभ यांनी स्वत:जवळचं असंल नसलं सगळं गमावलं होतं.
एकामागून एक चित्रपट फ्लॉप होत होते. एबीसीएल नावाने सुरू केलेली कंपनी पुरती डुबली होती. या कंपनीसाठी अमिताभ यांनी लोकांकडून, बँकेसाठी भलमोठं कर्ज घेतलं होते. पहिल्या वर्षी 15 कोटींचा नफा झाला. पण नंतर ही कंपनी बुडीत निघाली. 1999 साली या कंपनीचं दिवाळं निघालं. 90 कोटींचं कर्ज डोक्यावर चढलं होतं. देणेकरी पैशांसाठी तगादा लाचत होते. मीडियामध्ये टीका होत होती. घरची आर्थिक स्थिती पूर्णपणे कोलमडली होती. परिस्थिती इतकी वाईट होती की, अभिषेकचं विदेशातील शिक्षण झेपत नव्हतं म्हणून त्यालाही शिक्षण सोडून मायदेशी परतावं लागलं होतं. अमिताभ डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत कर्जात बुडाले होते आणि अगदी पडेल ते काम करायलाही तयार होते.
सिमी ग्रेवालने घेतलेल्या मुलाखतीत अमिताभ जे काही बोलले होते, त्यावरून त्यांच्या त्यावेळच्या परिस्थितीची कल्पना यावी. त्याकाळी जर मला कोणी फरशी पुसायला सांगितलं असतं तर मी पैशांसाठी ते देखील केलं असतं इतकी माझी परिस्थिती बेकार होती, असं अमिताभ त्या मुलाखतीत म्हणाले होते.
एक दिवस अभिषेकला बोलावलं आणि़...त्या रात्री अमिताभ यांनी अभिषेकला आपल्या जवळ बोलावलं आणि मनातल्या सगळ्या गोष्टी त्याच्यासोबत शेअर केल्यात. चित्रपट चालत नाहीयेत, बिझनेस बुडाला आहे. काहीही ठीक नाही. पण आता मी ठरवलंय, मी फक्त अभिनयावरच लक्ष केंद्रीत करणार, असं अमिताभ यांनी अभिषेकला सांगितलं आणि त्याचक्षणी त्यांनी एक मोठा निर्णय घेतला.
दुस-या दिवशी सकाळी यश चोप्रांच्या घरी पोहोचले...दुस-या दिवशी सकाळी सकाळी अमिताभ यश चोप्रांच्या घरी पोहोचलेत आणि त्यांना काम देण्याची विनंती केली. माझ्याकडे काम नाही. मला सध्या कोणीही काम देत नाहीये. कृपा करून माझी मदत करा, मला काम द्या. एक तरी सिनेमा द्या, अशी गयावया त्यांनी केली. खरे तर त्यावेळी अमिताभ हिरो म्हणून कोणत्याच सिनेमात फिट होणार नव्हते. अनेक नव्या दमाच्या हिरोंची चलती होती. पण अमिताभ यांच्या शब्दाला मान देऊन यश चोप्रा यांनी बिग बींसाठी ‘मोहब्बतें’ बनवला. या सिनेमात अमिताभ यांच्यासह शाहरूख खान, ऐश्वर्या राय, उदय चोप्रा, शमिता शेट्टी, किम शर्मा असे अनेक कलाकार होते. पण या चित्रपटातील बिग बींची भूमिका खूप महत्वाची होती. स्क्रिप्ट वाचताच बच्चन यांनी होकार भरला. लोकांना हा चित्रपट खूप आवडला. या चित्रपटानंतर अमिताभ बच्चन यांना चांगल्या कामाच्या आॅफर येऊ लागल्या आणि बच्चन कुटुंबाचं आयुष्य रुळावर आलं.
‘कौन बनेगा करोडपती’नं सावरलं..‘मोहब्बतें’ने गाडी रूळावर आली होती. पण स्थिती इतक्यात सावरणार नव्हतीच. अशावेळी अमिताभ यांना ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो होस्ट करण्याची संधी मिळाली. हा शो करू नको असा सल्ला अनेकांनी अमिताभ यांना दिला होता. कारण, त्यावेळी मोठ्या पडद्यावरील कलाकार टीव्ही कार्यक्रमांमध्ये दिसत नव्हते आणि दोन्ही इंडस्ट्रीमध्ये मोठी तफावत होती. मात्र, अमिताभ यांनी कोणाचंच ऐकलं नाही, त्यांना जे योग्य वाटलं तेच त्यांनी केलं. त्यांचा निर्णय योग्य ठरला. बिग बी यांचं आयुष्य या शो नंतर पूर्णपणे बदललं.