Amitabh Bachchan birthday : अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आज महानायक आहेत. जगभर त्यांचे चाहते आहेत. पण सुरूवातीचा त्यांचा स्ट्रगल सोपा नव्हता. सततच्या नकाराने अमिताभ निराश झाले होते. खचले होते. वडील हरिवंशराय बच्चन (Harivansh Rai Bachchan) साहित्य क्षेत्रातलं मोठं नाव होतं. पण त्यांचा मुलगा अमिताभ नोकरीसाठी धक्के खात फिरत होता. हा किस्सा त्याच काळातला...
एकीकडे पदवी घेतल्यानंतर आता पुढे काय? हा प्रश्न विचारून लोकांनी अक्षरश: वैताग आणला होता. दुसरीकडे नकारावर नकार मिळत होते. अमिताभ यांना नोकरी हवी होती. पण नोकरी मिळत नव्हती. शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमिताभ नोकरीच्या शोधासाठी दिल्लीत गेले. आकाशवाणी केंद्रात त्यांनी नोकरीसाठी अर्ज केला. पण तिथेही आवाज चांगला नाही म्हणून त्यांना नकार दिला गेला. सततच्या नकाराने अमिताभ प्रचंड वैतागले होते. आईबापानं जन्मचं का दिला?..., असाच त्यांच्यासारखा वैतागलेला एक मित्र त्यांना बोलता बोलता म्हणाला आणि वैतागलेल्या अमिताभला आपल्या या मित्राचं म्हणणं पटलं. खरंच, आईबापानं आपल्याला जन्मचं का दिला? असा विचार अमिताभ यांच्याही मनात घोळत राहिला.
एक दिवस हाच वैताग घेऊन अमिताभ वडिल हरिवंशराय यांच्या खोलीत शिरले. राग होताच... रागाच्या भरातच ‘आपने हमें पैदा ही क्यों किया?’ असं ते वडिलांना म्हणाले. मुलाचा हा प्रश्न ऐकून हरिवंशराय एकदम स्तब्ध झालेत. व्यथित नजरेने ते फक्त मुलाकडे बघत राहिले. खोलीभर शांतता पसरली. अखेर अवघडून अमिताभ हेच त्या खोलीत चालते झालेत. काही क्षणातच अमिताभ यांना पश्चाताप झाला. बापूजींना आपण रागाच्या भरात दुखावलं, या पश्चातापाने अमिताभ रात्रभर अस्वस्थ राहिले.
दुसऱ्या दिवशी सकाळी वडिल हरिवंशराय स्वत: अमिताभ यांच्या खोलीत आले. त्यांनी अमिताभ यांना झोपेतून उठवत त्यांच्या हाती एक कागद दिला आणि काहीही न बोलता ते निघून गेले. वडिलांनी दिलेल्या त्या कागदावर एक कविता लिहिलेली होती. कवितेचं नाव होतं ‘नया लिक’.
काय होती ती कविता...?
जिंदगी और जमाने की कशमकश से घबराकर, मेरे बेटे मुझसे पूछते हैं कि हमें पैदा क्यों किया था? और मेरे पास इसके सिवाय कोई जवाब नहीं है कि, मेरे बाप ने मुझसे बिना पूछे मुझे क्यों पैदा किया था? और मेरे बाप को उनके बाप ने बिना पूछे उन्हें और उनके बाबा को बिना पूछे ,उनके बाप ने उन्हें क्यों पैदा किया था?जिंदगी और जमाने की कश्मकश पहले भी थी...अब भी है, शायद ज्यादा,आगे भी होगी, शायद और ज्यादा..तुम ही नई लीक धरना,अपने बेटों से पुछकर उन्हें पैदा करना...!!
या कवितेतून वडिलांनी अमिताभ यांना आयुष्यभराची शिकवण दिली होती. आज माझ्या मुलाने मला विचारलं, मला जन्म का दिला? पण ही जीवनाची साखळी फार पूर्वीपासून चालत आली आहे. पण माझ्या मुला, तू असं करू नकोस. तू एखादी नवी वाट धर आणि मुलांना जन्म दे...