मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी गेल्या काही वर्षांत आपल्या अभिनयाने हजारो प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. रुपेरी पडद्यासह अमिताभ बच्चन यांनी छोट्या पडद्यावरही आपला ठसा उमठवला आहे. अमिताभ बच्चन यांचे चाहते फक्त भारतातच नाही, तर जगभरात आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी अंगरक्षक (बॉडीगार्ड) म्हणून मुंबई पोलीस विभागाशी संबंधीत कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदे दिसून येत होते. मात्र, जितेंद्र शिंदे यांना मिळणाऱ्या पगाराचे वृत्त समोर आल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली असून मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. (Amitabh Bachchan bodyguard Jitendra Shinde Salary 1.5 crore Rupees annually)
अमिताभ बच्चन यांच्यासोबत सावलीसारखे बहुतेक फोटोंमध्ये जितेंद्र शिंदे हे अमिताभ बच्चन यांच्या मागे किंवा आजूबाजूला उभे असलेले दिसतात. पण इतक्या मोठ्या जबाबदारीच्या कामासाठी जितेंद्र शिंदे किती पगार घेत असतील? टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, जितेंद्र शिंदे यांची सुरक्षा एजन्सी आहे, पण ते स्वतः बिग बी अमिताभ बच्चन यांचे संरक्षण करतात.
अमिताभ बच्चन यांच्या बॉडीगार्डचा पगारसार्वजनिक कार्यक्रमांपासून 'कौन बनेगा करोडपती'च्या सेटपर्यंत, अमिताभ बच्चन जिथे जातात तिथे जितेंद्र शिंदे त्यांच्यासोबत सावलीप्रमाणे असतात. रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांची सुरक्षा सांभाळण्यासाठी जितेंद्र शिंदे यांना वार्षिक 1.5 कोटी रुपये पगार मिळतो. म्हणजेच, दरमहा जितेंद्र शिंदे यांना जवळपास 12,50,000 रुपये पगार मिळतो. देशातील अनेक खासगी कंपन्यांच्या सीईओंच्या पगारापेक्षाही जास्त पगार अमिताभ बच्चन यांच्या या बॉडीगार्डला मिळतो, हे ऐकून कुणालाही धक्का बसेल. दरम्यान, जितेंद्र शिंदे हे बॉलिवूडच्या महागड्या बॉडीगार्डपैकी एक आहेत. अभिनेत्री दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा, शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यासह इतर अनेक सेलिब्रिटीही त्यांच्या बॉडीगार्डना मोठ्या प्रमाणात मानधन देतात.
पगाराच्या वृत्तानंतर जितेंद्र शिंदेंची बदलीमुंबई पोलीस विभागाशी संबंधीत कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदे यांना अमिताभ बच्चन यांचे बॉडीगार्ड म्हणून तैनात करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते अमिताभ बच्चन यांचे बॉडीगार्ड म्हणून काम करत होते. दरम्यान, जितेंद्र शिंदे यांना वार्षिक १.५ कोटी रुपयांचा पगार मिळत असल्याचे वृत्त आल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली आहे. तसेच, जितेंद्र शिंदे यांनी अमिताभ बच्चन यांच्याकडून पैसे मिळविले की इतर कोणाकडून याचा तपास आता मुंबई पोलीस करत आहेत.
अमिताभ बच्चन यांनी पैसे दिले नाहीत - जितेंद्र शिंदे जितेंद्र शिंदे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले की, त्यांची पत्नी सुरक्षा एजन्सी चालवते. अमिताभ बच्चन यांनी १.५ कोटी रुपये दिले नाहीत, असेही ते म्हणाले. तसेच, ही सुरक्षा एजन्सी इतर अनेक सेलिब्रिटी आणि प्रसिद्ध लोकांना सुरक्षा प्रदान करते, असे सूत्रांनी सांगितले.