आजकाल सिनेमांपेक्षा त्यांच्या बजेटचीच चर्चा जास्त असते. आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर केल्यामुळे खर्चात वाढ होते. एक सिनेमा बनवण्यासाठी करोडो रुपये खर्च केले जातात. एखाद्या सिनेमावर ३००-४०० कोटी रुपये खर्च होणं खूपच सामान्य झालं आहे. पण आधीचा काळ वेगळाच होता. तेव्हा खूप कमी खर्चात उत्कृष्ट सिनेमे बनत होते. 48 वर्षांपूर्वी असाच एक सिनेमा रिलीज झाला होता ज्यासाठी केवळ १५ लाख खर्च केले गेले. कोणता आहे तो सिनेमा?
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) , धर्मेंद्र (Dharmendra) अशी दिग्गज स्टारकास्ट असलेला सिनेमा केवळ १५ लाख रुपयात तयार होऊ शकतो यावर तुमचा विश्वासही बसणार नाही. या सिनेमाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ केला होता. सिनेमात अमिताभ, धर्मेंद्र यांच्या जोडीला जया बच्चन आणि शर्मिला टागोर होत्या. यामध्ये कलाकारांची अदलाबदली करताना जो काही कॉमिक टच दिला होता प्रेक्षक अक्षरश: खळखळून हसले. आजही सिनेमाची खूप तारीफ होते.
आम्ही बोलत आहोत 48 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या 'चुपके चुपके' सिनेमाबद्दल. १९७५ साली हा सिनेमा प्रदर्शित झाला. त्यावर्षी सर्वात जास्त कमाई करणारा हा १८ वा चित्रपट होता. बंगाली चित्रपट 'छदमबेसी'चा तो रिमेक होता. माध्यम रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट बनवण्यासाठी फक्त १५ लाख रुपये खर्च झाले होते. तर सिनेमाने वर्ल्डवाईड तब्बल 1.2 कोटींचा गल्ला जमवला होता. या सिनेमाची आजही चर्चा होत असते. अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांनी प्रोफेसरची भूमिका साकारली आहे. त्यांचं विनोदाचं टायमिंग अगदी अचूक जमलं आहे. आजही टीव्हीवर सिनेमा लागला की प्रेक्षक आवर्जुन बघतात.