अमिताभ बच्चन यांनी नुकतेच ट्वीट करून नागपूरकरांचे आभार मानले आहेत. नागपूरकरांनी मला दिलेल्या प्रेमासाठी मी त्यांचा कायम ऋणी आहे या शब्दांत त्यांनी ट्वीट करत नागपूरकरांवरचे आपले प्रेम दाखवून दिले आहे. त्यांनी या फोटोसोबत नागपूरमधील हॉटेलमध्ये, लॉबीमध्ये त्यांची एक झलक पाहाण्यासाठी गर्दी केलेल्या लोकांचा फोटो देखील ट्वीट केला आहे. अमिताभ हे गेल्या कित्येक दिवसांपासून नागपूरमध्ये त्यांच्या एका चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत.
‘सैराट’ फेम नागराज मंजुळे यांच्या पहिला वहिला हिंदी चित्रपट ‘झुंड’ येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत असून या चित्रपटाचे चित्रीकरण ते सध्या नागपूरमध्ये करत आहेत. अमिताभ यांनीच ते नागपूरात दाखल झाले असल्याचे सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांना सांगितले होते. नागपूर विमानतळावरचे दोन फोटो शेअर करत आपण नागपुरात असल्याची माहिती त्यांनी दिली होती. ‘NAGPUR .. for 'Jhund' .. the new project by Nagraj , his first in Hindi, the maker of 'Sairat' the Marathi block buster .. a centre of attraction .. and NAGPUR, geographically apparently the centre of geographic India .. may the 2 centres thrive ,’ असे अमिताभ यांनी लिहिले होते.
झुंड’चे शूटींग नागपूरमधील मोहननगर या भागात सुरू आहे. याठिकाणी असलेल्या एका शाळेच्या मागच्या आवारात ‘झुंड’चा सेट लागला आहे. अमिताभ या भागात आहेत हे कळल्यावर त्यांच्या चाहत्यांनी तिथे प्रचंड गर्दी केली होती.
अमिताभ यांचा ‘झुंड’ हा चित्रपट फुटबॉल कोच विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट भूषण कुमार, कृष्ण कुमार, सविता राज, राज हिरेमथ आणि नागराज मंजुळे मिळून प्रोड्यूस करत आहेत. हा नागराज यांचा बॉलिवूडचा पहिला हिंदी सिनेमा असणार आहे आणि या पहिल्या चित्रपटात महानायक अमिताभ दिसणार आहेत. साहजिकच त्यांच्यासाठीचं नव्हे तर तमाम मराठीजनांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.