मुसळधार पाऊस आणि यानंतर आलेला महापूर यात केरळचे अतोनात नुकसान झाले. हळूहळू केरळचे जीवन पूर्वपदावर येत आहे, पण अद्यापही केरळवासियांना सावरायला बराच वेळ लागणार आहे. यादरम्यान देशभरातून केरळला मदतीचा ओघ सुरू आहे. शाहरूख खान, अक्षय कुमारपासून सुशांत सिंग राजपूत अशा अनेक बॉलिवूड कलाकारांनीही केरळमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनीही केरळला ५१ लाख रूपयांची मदत दिली. याशिवाय आपल्या काही बहुमूल्य गोष्टीही दान म्हणून दिल्यात. यात २५ पँट्स, २० जॅकेट्स, २० शर्टसचा समावेश आहे. पण हे माहित नसलेल्या एका युजरने केरळच्या मदतीवरून अमिताभ यांना घेरण्याचा प्रयत्न केला. मग काय, अमिताभ यांनी त्याची बोलती बंद केली.
त्याचे झाले असे की, अमिताभ यांनी एका रेकॉर्डिंग स्टुडिओमधील स्वत:चा एक फोटो शेअर केला. यावर एका युजरने त्यांना केरळसाठी मदत दिली का? असा थेट सवाल केला. या प्रश्नावर अमिताभ चांगलेच संतापले आणि त्यांनी या युजरलाचं प्रतिप्रश्न केला. ‘पता चल जाएगा आपको, आपने दिया क्या?’ असे अमिताभ यांनी लिहिले. अमिताभ यांच्या या प्रश्नानंतर मात्र त्या युजरची बोलतीच बंद झाली.