मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा 'झुंड' हा हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडचे सुपरस्टार म्हणजेच अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या नागपूर तसेच आजुबाजूच्या गावांमध्ये सुरू आहे. इथले वातावरण अमिताभ बच्चन यांना खूपच आवडले असून सोशल मीडियावर त्यांनी काही खास फोटो शेअर करून गावाकडील आठवणींना उजाळा दिला आहे.
'झुंड' सिनेमाच्या निमित्ताने अमिताभ बच्चन यांना गावाकडची शैली अनुभवायला मिळत असून त्यांनीदेखील याचा मनमुराद आनंद लुटला.
बैलगाडीची स्वारी, बसचा प्रवास आणि खाटेवरची झोप हे सर्व बिग बींना फारच आवडले आहे. हे सर्व त्यांच्या फोटोवरून दिसते. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्यांनी 'बड़े दिनों के बाद गाँव की खटिया का आनंद लूटा ; और बैल गाड़ी की सवारी का', असे कॅप्शन दिले आहे.
आतापर्यंत अमिताभ बच्चन यांनी अनेक बिग बजेट चित्रपटात काम केले आहे. यासाठी त्यांना अनेकदा परदेश दौरे करावे लागतात. मात्र, 'झुंड' चित्रपटाच्या निमित्ताने मातीशी असलेली नाळ पुन्हा जुळली गेली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. अमिताभ यांचा ‘झुंड’ हा चित्रपट फुटबॉल कोच विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट भूषण कुमार, कृष्ण कुमार, सविता राज, राज हिरेमथ आणि नागराज मंजुळे मिळून प्रोड्यूस करत आहेत. हा नागराज यांचा बॉलिवूडचा पहिला हिंदी सिनेमा असणार आहे आणि या पहिल्या चित्रपटात महानायक अमिताभ दिसणार आहेत. या चित्रपटात इतर कोण मुख्य भूमिका साकारत आहेत हा प्रश्न गुलदस्त्यात आहे.