Join us  

हौसेने घरी आणलेले महाभारताचे ग्रंथ लायब्ररीला दिले! बिग बींनी सांगितलेलं कारण ऐकून चकीत व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 1:23 PM

घरात आणलेले महाभारताचे ग्रंथ अमिताभ बच्चन यांनी लायब्ररीला दान करण्याचा निर्णय घेतला. कारण ऐकून सर्वांच्या भूवया उंचावल्या (amitabh bachchan, mahabharat)

अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधले शहनशाह म्हणून ओळखले जातात. अमिताभ यांनी गेली अनेक वर्ष भारतीय भाषांतील विविध सिनेमांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. नुकताच रिलीज झालेला अमिताभ यांचा 'कल्कि २८९८ एडी' आणि त्यांनी साकारलेली अश्वत्थामाची भूमिका चांगलीच गाजतेय. 'कल्कि' सिनेमा महाभारतावर आधारीत आहे हे एव्हाना सर्वांना कळलं आहे. अमिताभ बच्चन यांनीही घरात महाभारताचे ग्रंथ हौसेपोटी आणले होते. पुढे हे ग्रंथ त्यांनी लायब्ररीला दान केलं. काय होतं यामागचं कारण.

अमिताभ यांनी घरी मागवली महाभारताची पुस्तकं पण...

अमिताभ हे ब्लॉगमार्फत त्यांच्या आयुष्याबद्दलचे विविध अपडेट्स शेअर करत असतात. नव्या ब्लॉगमध्ये अमिताभ यांनी महाभारताची पुस्तकं घरात का ठेवत नाहीत, याचा खुलासा केलाय. 'कल्कि' सिनेमात काम करण्याच्या निमित्ताने पौराणिक कथांबद्दल बिग बींच्या मनात रुची निर्माण झाली. पौराणित कथांमध्ये कल्किचा जन्म आणि ब्रम्हांडाची उत्पत्ती याविषयी सविस्तर माहिती आहे. 

 

बिग बींनी महाभारताची पुस्तकं लायब्ररीला का दिली

अमिताभ यांनी ब्लॉगमध्ये पुढे सविस्तर खुलासा केलाय की, "आपल्या पुराणात ज्या गोष्टी आहेत त्यामुळे माझ्यासारख्या अशिक्षित माणसांना शिक्षित व्हायला मदत होते. त्यामुळे अनेक व्यक्तींना मूल्यांची शिकवण मिळतेय. ज्ञान मिळवण्यासाठी मी महाभारतावर आधारीत ग्रंथ मागवले. परंतु या पुस्तकांना घरात ठेवत नाहीत. त्यामुळे मी महाभारतावरील पुस्तकं लायब्ररीत दिली. महाभारत घरात ठेवल्यावर कुटुंबातील लोकांमध्ये मतभेद आणि वाद निर्माण होतात, म्हणून महाभारत घरात ठेवत नाहीत असं म्हटलं जातं." असा खुलासा बिग बींनी केला. बिग बींच्या 'कल्कि २८९८ एडी' सिनेमाने ५०० कोटींच्या वर कमाई केलीय. 

टॅग्स :अमिताभ बच्चनमहाभारतवाचनालय