Join us

सौदी अरेबियामध्ये आहे ‘शहेनशाह’चं स्टील आर्म जॅकेट; तुम्हाला माहितीये का त्यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 9:12 AM

Amitabh bachchan: १९८८ साली प्रदर्शित झालेल्या शहेनशाह या सिनेमात अमिताभ बच्चन यांनी हे जॅकेट परिधान केलं होतं

बॉलिवूडचा महानायक, शहेनशाह, बिग बी अशा कितीतरी नावाने प्रसिद्ध असलेला अभिनेता म्हणजे अमिताभ बच्चन (Amitabh bachchan).  आजवरच्या कारकिर्दीत असंख्य सिनेमात झळकलेले बिग बी यांनी छोट्या पडद्यावरही काम केलं आहे. त्यामुळे त्यांचा आज मोठा चाहतवर्ग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीवर राज्य करणाऱ्या बिग बींनी अनेक सुपरहिट सिनेमा दिले. त्यातलाच एक सिनेमा म्हणजे ‘शहेनशाह’. हा सिनेमा १९८८ च्या काळात तुफान गाजला. किंबहुना आजही त्याची चर्चा रंगते. यामध्येच या सिनेमात बिग बींनी परिधान केलेलं स्टील आणि साखळ्यांचं जॅकेट विशेष चर्चिलं गेलं होतं. मात्र, आता हे जॅकेट कुठे आहे हा प्रश्न अनेकांना पडतो. या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या एका मित्राने दिलं आहे.

१९८८ साली प्रदर्शित झालेल्या शहेनशाह या सिनेमाने त्याकाळी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. या सिनेमातील अमिताभ बच्चन यांचे डायलॉग्स विशेष गाजले होते. सोबतच त्यांनी परिधान केलेलं स्टील आणि साखळ्यांचं युनिक जॅकेटही चर्चेत आलं होतं. विशेष म्हणजे असं जॅकेट यापूर्वी कोणत्याही सिनेमात पाहायला मिळालं नव्हतं. किंवा, त्यानंतरही दिसलं नाही. त्यामुळे बिग बींच्या या जॅकेटचं काय झालं? आता ते कोणाकडे आहे? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडतो.  परंतु, बिग बींचं हे जॅकेट थेट सौदी अरेबियामध्ये असल्याचं सांगण्यात येतं.

शहेनशाह या सिनेमात अमिताभ बच्चन यांनी घातलेलं जॅकेट आता सौदी अरेबियामध्ये आहे. येथे राहणाऱ्या तुर्की अल्लालशिख या नावाच्या व्यक्तीकडे ते जॅकेट आहे. तुर्की अल्लालशिख हा बिग बींचा मित्र आहे. त्यामुळे अमिताभ यांनी हे स्टील आर्म जॅकेट त्याला गिफ्ट म्हणून दिलं आहे.याविषयी तुर्की अल्लालशिख यांनी ट्विट करत याविषयीची माहिती दिली होती.

 “जगातील सर्वोत्कृष्ट आणि दिग्गज अभिनेत्यांपैकी… तुम्ही केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी सन्मान आहात. तुम्ही मला पाठवलेल्या भेटवस्तूबद्दल खूप खूप धन्यवाद. माझ्यासाठी ही भेट खूप अनमोल आहे,” असं त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्याचं हे ट्विट बिग बींनीही रिट्विट करत त्याला रिप्लाय दिला. “माझा सर्वात प्रिय आणि सर्वात विचारशील मित्र... तुला स्टील आर्म जॅकेट भेट देणं खूप सन्मानाची गोष्ट आहे.. हे मी माझ्या ‘शहेनशाह’ चित्रपटात परिधान केले होतं. मी ते जॅकेट घालून कसं वावरतो, ते मी तुला कधीतरी नंतर सांगेन. माझ्याकडून खूप प्रेम,” असं अमिताभ यांनी लिहिलं.  

दरम्यान, शहेनशाह या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासह मीनाक्षी शेषाद्री, प्राण, अरुणा इराणी, प्रेम चोप्रा, अमरीश पुरी, कादर खान, अवतार गिल या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.  

टॅग्स :अमिताभ बच्चनबॉलिवूडसिनेमासेलिब्रिटी