महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन म्हणायला अनेक वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीत आहे. पण या अनेक वर्षांत यशाने त्याला कायम हुलकावणी दिली. फ्लॉपचा शिक्का माथी बसलेला अभिषेक यावरून अनेकदा ट्रोल झाला. आजही कधी कामावरून तर कधी अभिनयावरून त्याला ट्रोल केले जाते. आता मात्र ट्रोलर्सनी अमिताभ यांची लेक श्वेता बच्चन हिला ट्रोल केले. श्वेताची मुलगी नव्या नवेली नंदा हिने एक पोस्ट केली आणि या पोस्टवरून एका महिला युजरने नव्याची आई श्वेताला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
तर नव्या नवेलीने नुकताच प्रोजेक्ट ‘नवेली’ लॉन्च केला. यासंदर्भात ‘वोग इंडिया’ला नव्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीतील काही ओळींसह नव्याने सोशल मीडियावर एक पोस्ट केली. ‘मी माझ्या कुटुंबातील महिलांना काम करताना पाहत आले आहे. माझी आजी,आई आणि आत्या सर्व कामकाजी महिला आहेत,’ असे नव्याने या मुलाखतीत म्हटले आहे. यावर एक महिला युजरने नव्याला आणि पर्यायाने तिची आई श्वेता बच्चन हिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
‘हिची आई (श्वेता बच्चन) काय काम करते?’ अशी खिल्ली उडवणारी कमेंट तिने केली. या महिला युजरला श्वेताने नाही तर नव्या हिनेच सणसणीत उत्तर दिले. माझी आई एक लेखिका, डिझाईनर, पत्नी व आई आहे, असे नव्याने उत्तरादाखल लिहिले. याचा स्क्रिनशॉट नव्याने आपल्या इन्स्टास्टोरीवरही लावला.
‘पत्नी आणि आई असणे हा एक फुलटाईम जॉब आहे. ज्या महिला घरी राहतात, गृहिणी आहेत. त्यांच्या कामाला कमी लेखू नका. एक पिढी घडवण्यात महिलेची भूमिका खूप मोठी असते,’ असे तिने लिहिले.महानायक अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा हिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. श्वेता फिल्मी दुनियेत नाही. पण म्हणून फिल्मी दुनियेशी तिचे नातेचं नाहीच, असे मात्र मुळीच नाही. ग्लॅमर दुनियेपासून दूर असली तरी श्वेता कायम चर्चेत असते. श्वेता ही अमिताभ व जया यांची मोठी मुलगी आहे.1997मध्ये तिने निखील नंदासोबत लग्न केले. तिला नव्या नवेली नंदा आणि अगस्त्या नंदा अशी दोन मुले आहेत.