बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेली जोडी म्हणजे अमिताभ बच्चन (amitabh bachchan) आणि रेखा (rekha). गेल्या कित्येक वर्षांपासून कलाविश्वावर राज्य करणाऱ्या या जोडीच्या अफेअरचे अनेक किस्से चर्चिले गेले.किंबहुना अद्यापही त्यांची चर्चा रंगते. एकेकाळी ही जोडी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाली होती असं म्हटलं जातं. त्यामुळे यांची लव्हस्टोरी आजही बॉलिवूडमधील हिट लव्हस्टोरी म्हणून ओळखली जाते. परंतु, एक काळ असा होता जेव्हा अमिताभ बच्चन यांचं नाव अभिनेत्री अर्चना पूरनसिंग हिच्यासोबत जोडलं गेलं होतं. बिग बी आणि अर्चना पूरनसिंग एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनी त्याकाळी मोठा जोर धरला होता.
१९९२ मध्ये एका फिल्म मॅगझिनच्या कव्हर पेजवर अर्चना पूरनसिंग आणि अमिताभ बच्चन यांचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला होता. हा फोटो पाहिल्यावर त्याकाळी मोठी खळबळ उडाली होती. बिग बी आणि अर्चना एकमेकांना डेट करतायेत अशी चर्चा वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. इतकंच नाही तर हा किस्सा अनेकांनी रंगवून सांगायलाही सुरुवात केली. विशेष म्हणजे ही चर्चा रंगण्यामागे एक खास कारण होतं.
अर्चना आणि बिग बी यांचा फोटो मॅगझीनवर छापल्यानंतर त्या फोटोखाली 'Amitabh and Archana Caught Red Handed in Love Nest.' असं कॅप्शन देण्यात आलं होतं. हे कॅप्शन वाचल्यावर ही जोडी एकमेकांना डेट करतीये अशी चर्चा सुरु झाली. परंतु, या फोटो आणि कॅप्शनच्या मागे एक वेगळंच कारण होतं. ही जोडी खरोखर एकमेकांना डेट करत नव्हती. तर, तो लोकांना फसवण्याचा एक मजेशीर मार्ग होता.
खरंच बिग बी करत होते अर्चनाला डेट?
अर्चना आणि बिग बी यांचा हा फोटो त्याकाळी वाऱ्यासारखा व्हायरल झाला होता. परंतु, फोटोमध्ये अर्चनासोबत दिसणारी व्यक्ती बिग बी नव्हतीच. अर्चनासोबत असलेला व्यक्ती विजय सक्सेना होता. विजय सक्सेना हे हुबेहूब बिग बींसारखे दिसायचे. त्यामुळे फोटोमध्ये अर्चनासोबत बिग बीच आहेत असा समज लोकांनी केला. इतकंच नाही तर मॅगझिननेही एप्रिल महिना असल्यामुळे वाचकांना एप्रिल फूल केलं होतं. विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टींची बिग बींना पूर्ण खबर होती. त्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्यावर ते एकदम शांत होते.
दरम्यान, हा फोटो मॅगझीनमध्ये शेअर करण्यासोबतच ते खाली 'हा फक्त एक प्रँक आहे, जो एप्रिल फूलच्या निमित्ताने करण्यात आला आहे,' अशी टीप लिहिणार होते. मात्र, ऐनवेळी फोटोखाली असं काहीही लिहिण्यात आलं नाही. त्यामुळे अर्चना आणि बिग बींच्या अफेअरची चर्चा रंगली. परंतु, यात प्रत्यक्षात काहीच तथ्य नव्हतं.