बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून बच्चन यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. बिग बी यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, माझ्या आजूबाजूला असलेल्या सर्वांनी कृपया स्वतःची चाचणी करून घ्या असं आवाहनही बच्चन यांनी केले होते. दुसऱ्यांदा त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. याच दरम्यान ते सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना आपल्या प्रकृतीची माहिती देतात. त्यांच्या एका नव्या ब्लॉगमधून त्यांनी कोरोना काळतला अनुभव शेअर केला आहे. बिग बींनी एक ब्लॉग लिहून त्यात आपल्या तब्येतीची माहिती दिली. आपली सर्व कामं आपण स्वत: करत आहोत, असंही त्यांनी त्यामध्ये म्हटलं आहे. तसेच कोरोनाशी ते कसा सामना करत आहेत आणि क्वारंटाईनमधला वेळ कसा घालवत आहेत, याविषयी देखील ब्लॉगमध्ये लिहिलं आहे. आधी प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या स्टाफवर अवलंबून असलेले अमिताभ बच्चन आता स्वत: घरातील सर्व कामं करत आहेत.
"कोरोनाची लागण झाल्यापासून मी माझी सर्व कामं स्वत:च करतोय"
"कोरोनाची लागण झाल्यापासून मी माझी सर्व कामं स्वत:च करत आहे. स्वत:च माझं अंथरुण घालतोय, कपडे धुतोय, फरशी आणि टॉयलेटसुद्धा साफ करतोय. या सर्व कामांसोबतच मी स्वत:ची चहा-कॉफीदेखील बनवून घेत आहे. एखादा स्विच ऑन किंवा ऑफ करायचा असेल तर तेसुद्धा मीच करत आहे. सगळे फोन कॉल्स मी स्वत: उचलतोय आणि पत्रसुद्धा स्वत: लिहितोय. कोणत्याही नर्सिंग स्टाफशिवाय मी माझी औषधं वेळेवर घेतोय. सध्या मी माझा दिवस असाच घालवत आहे" असं बच्चन यांनी ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.
"स्वत:ला आनंदी ठेवण्याचा अनुभव"
सगळी कामं स्वत:च करण्याचा एक वेगळाच आनंद बिग बी अनुभवत आहेत. "हा खूपच मजेशीर आणि स्वत:ला आनंदी ठेवण्याचा अनुभव आहे. अशाने मी माझ्या स्टाफवर फारसा अवलंबून राहत नाही आणि त्यांना माझी किती कामं करावी लागतात हे मला कळतंय. त्यामुळे त्यांच्याप्रती असलेला आदर माझ्या मनात आणखीनच वाढला आहे" असं देखील म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.