मराठी चित्रपट 'सैराट'च्या यशानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे आगामी चित्रपट 'झुंड'च्या तयारीला लागले आहेत. एक वर्षांपासून हा सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये अडथळे येत होते. या चित्रपटाचा सेट पुण्यात तयारही झाला होता. मात्र तिथे चित्रीकरण होऊ शकले नाही. मात्र आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमिताभ बच्चन झुंड चित्रपटाच्या चित्रीकरणाला नोव्हेंबरमध्ये सुरूवात करणार आहे.
'झुंड' चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण नागपूरमध्ये होणार आहे. ७५ ते ८० दिवसाच्या चित्रीकरणामध्ये अमिताभ बच्चन सलग ४५ दिवस नागपूरमध्ये चित्रीकरण करणार आहेत. या दरम्यान मुले बिग बींना भेटतील व त्यांच्यासोबत चित्रीकरणाच्या दोन-तीन दिवस आधी रिहर्सल करतील. रस्त्यावर राहणारी मुले या सिनेमात काम करणार आहेत. त्यांना ट्रेनिंग दिले असून ते आता प्रोफेशनल आर्टिस्ट झाले आहेत. या सिनेमात बिग बी झोपडपट्टीत राहणाऱ्या फुटबॉल खेळणाऱ्या मुलांचे प्रशिक्षक विजय बरसे यांची भूमिका साकारणार आहेत. हा सिनेमा खऱ्या घटनेने प्रेरीत आहे. अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याबाबत दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणाले की, 'अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करायला मिळत आहे हे स्वप्नासारखे आहे. ते माझे आवडते व्यक्ती आहेत. ते प्रत्येक भूमिकेत अगदी फिट बसतात व ते पात्राला योग्य न्याय देतात. या सिनेमातील इतर कलाकार नवोदीत आहे आणि नवोदीत कलाकारांसोबत काम कसे करून घ्यायचे हे मला माहित आहे.' 'झुंड' सिनेमाची निर्मिती टीसीरिजचे भूषण कुमार, सविता राज हिरेमाथ व नागराज मंजुळे यांनी केली आहे. सध्या अमिताभ बच्चन रिएलिटी शो 'कौन बनेगा करोडपती'चे शूटिंग करत आहेत. शोच्या अंतिम सोहळ्यानंतर ते लगेच 'झुंड'च्या शुटिंगसाठी नागपूरला रवाना होणार आहेत.