Join us

पत्नी जया बच्चन यांना सर्वोत्कृष्ट संसद पुरस्कार मिळाल्याचा अमिताभ बच्चन यांना सार्थ अभिमान!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2017 12:12 PM

महानायक अमिताभ बच्चन यांच्या धर्मपत्नी जया बच्चन यांना ‘सर्वश्रेष्ठ संसद सदस्य’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने, बच्चन परिवारात आनंद साजरा केला जात आहे

बॉलिवूडमधील बच्चन परिवारात आजचा दिवस खूपच आनंद घेऊन आला आहे. होय, महानायक अमिताभ बच्चन यांच्या धर्मपत्नी जया बच्चन यांना ‘सर्वश्रेष्ठ संसद सदस्य’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने, बच्चन परिवारात याचा आनंद साजरा केला जात आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी तर ट्विटरवर पत्नी जया यांचा एक फोटो शेअर करीत त्यांचे अभिनंदन केले आहे. दिल्ली येथील विज्ञान भवन सभागृहात ‘लोकमत संसदीय पुरस्कार २०१७’चा शानदार सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात जया बच्चन यांना ‘सर्वोत्कृष्ट संसद सदस्य’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  अमिताभ बच्चन यांचा परिवार देशातील सन्मानित परिवारांपैकी एक आहे. अभिनय क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यातही हा परिवार सक्रिय आहे. सध्या जया बच्चन या राज्यसभेच्या खासदार असून, सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. याच कार्याची दखल म्हणून ‘लोकमत’ने त्यांचा सर्वोत्कृष्ट संसद सदस्य या पुरस्काराने गौरव केला. या पुरस्कारानंतर जया यांच्यावर सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. मात्र जया यांच्याकरिता सर्वांत स्पेशल शुभेच्छा महानायक अमिताभ बच्चन यांच्या ठरल्या आहेत. होय, अमिताभ यांनी जया यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे मी खूप आनंदी असल्याचे ट्विट केले आहे. बिग बीने एक ट्विट करताना त्यामध्ये जया यांचा फोटो शेअर केला. या फोटोमध्ये जया उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्याकडून हा पुरस्कार स्वीकारत आहेत. यावेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, लोकसभेतील कॉँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार व्यंकय्या नायडू, ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे चेअरमन विजय दर्डा, लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील, भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी, ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा दिसत आहेत. फोटो कॅप्शनमध्ये अमिताभ यांनी लिहिले की, ‘जयाला सर्वश्रेष्ठ संसद सदस्याचा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार आमच्या परिवारातील सर्व सदस्यांसाठी गौरवान्कित करणारा आहे. यावेळी अभिषेक बच्चन याने देखील आई जया बच्चन पुरस्कार स्विकारतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.  खरोखरच बच्चन परिवारासाठी हा पुरस्कार गर्व निर्माण करणारा असल्याच्या प्रतिक्रिया आता त्यांच्या चाहत्यांकडून व्यक्त केला जात आहे. जया यांनी एक संसद सदस्य म्हणून खूपच प्रभावी कार्य केले आहे. तिच्या या कामगिरीचा यापूर्वीदेखील गौरव करण्यात आला आहे. जया यांनी भदोही जिल्ह्यातील सुरियावा विकासखंडातील लागनबारी गावाला संसद सदस्य आदर्श ग्राम विकास योजनेअंतर्गत दत्तक घेतले आहे. या अगोदर त्यांनी ज्ञानपूर विकासखंडातील एक गाव दत्तक घेतले होते. या सर्व गावांमध्ये जया यांची कामगिरी कौतुकास्पद ठरली आहे. त्याचाच गौरव म्हणून ‘लोकमत’ने त्यांना सर्वोत्कृष्ट संसद सदस्य पुरस्काराने सन्मानित केले आहे.